टपाल कार्यालयात कोअर बँकिंग
By admin | Published: October 9, 2015 01:52 AM2015-10-09T01:52:32+5:302015-10-09T01:52:32+5:30
टपाल खात्याची एटीएम सेवा होणार सुरु.
नाना हिवराळे / खामगाव : कुरिअर सर्व्हिस आणि खासगी सेवांनी १५२ वर्षांचा इतिहास असलेल्या टपाल सेवेसमोर ठेवलेल्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी टपाल विभागही सध्या सक्रिय झाला असून, जिल्ह्यातील आठ टपाल कार्यालयामध्ये सीबीएस (कोअर बँकिंग प्रणाली) कार्यान्वित झाली आहे. दरम्यान, डिसेंबर अखेर जिल्ह्यातील ३५ ही टपाल कार्यालयात ही सेवा कार्यान्वित होत आहे. वर्षा अखेर खामगाव आणि बुलडाणा येथील टपाल कार्यालयामध्ये टपाल खात्याचे स्वतंत्र एटीएम कार्यान्वित होणार आहे. त्यासंदर्भातील सिव्हिल इंजिनियरिंग आणि इलेक्ट्रीकलची पायाभूत कामे या ठिकाणी पूर्ण झाली आहेत. दुसरीकडे आरबीआयने टपाल खात्याला पेमेंट बँकेचा दर्जा देण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. देशातील ११ संस्थांना अशा पद्धतीचा परवाना दिला जाणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा, खामगाव, चिखली, शेगाव, नांदुरा तालुक्यातील एक पोस्ट ऑफिस, पिंपळगाव राजा, मलकापूर आणि चैतन्यवाडी येथे कोअर बँकिंग सुरू झाली आहे.
९0 हजार ग्राहकांना मिळणार लाभ
बुलडाणा अधीक्षक डाक घर कार्यालयांतर्गत जिल्ह्यात जवळपास ९0 हजार टपाल खात्याचे ग्राहक आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिक बचत योजनांचे ९५, आरडीचे २६ हजार १७७, मन्थली इन्कम सेव्हिंगचे तीन हजार ४६२, टाइम डिपॉझीटचे ५७१, पीपीएफचे एक हजार ५0५ तथा राष्ट्रीय बचत पत्र आणि किसानपत्राचे मिळून जवळपास ९0 हजार ग्राहक २0१५ च्या प्रारंभीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.