कोरोना : १७ दिवसांत ४४ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:17 AM2021-03-18T04:17:50+5:302021-03-18T04:17:50+5:30
जानेवारीच्या सुरुवातीला जिल्ह्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात होती, मात्र फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच कोरोनाने पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव्ह ...
जानेवारीच्या सुरुवातीला जिल्ह्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात होती, मात्र फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच कोरोनाने पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा पहिल्यांदाच दोन हजारांवर गेला आहे. रुग्णसंख्या वाढल्याने रुग्णालयांमध्ये कोविड वॉर्डातील खाटांची संख्याही वाढविण्यात आली, मात्र अनेक रुग्ण कोविड चाचणी टाळत असल्याने त्यांची प्रकृती गंभीर होत आहे. अशातीलच जवळपास ४४ रुग्णांना मागील १७ दिवसांत जीव गमवावा लागला. मृतांमध्ये ४४ पैकी २६ जण हे अकोला महापालिका कार्यक्षेत्रातील रहिवासी असून, उर्वरित १८ रुग्ण हे ग्रामीण भागातील रहिवासी होते. मागील १७ दिवसांतील मृत्यूचा हा आकडा थक्क करणारा असून, अकोलेकरांची चिंता वाढविणारा आहे. नागरिकांनी वेळीच खबरदारी न बाळगल्यास मृत्यूचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मृतांमध्ये ६५ टक्के पुरुष
मागील १७ दिवसांमध्ये जिल्ह्यात ४४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये २८ पुरुष व १६ महिलांचा समावेश आहे. म्हणजेच ४४ मृतांमध्ये ६५ टक्के पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
सप्टेंबरपेक्षाही घातक ठरला मार्च
गतवर्षी सप्टेंबर महिना सर्वाधिक घातक ठरला होता. या महिनाभरात ३,४६८ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता, तर ८४ जणांचा मृत्यू झाला होता. या कालावधीत २,६४४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला होता. तुलनेने मार्च महिना सप्टेंबरपेक्षाही घातक ठरल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. मागील १७ दिवसांत कोरोनाचे ६ हजार ४६८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, ही संख्या सप्टेंबर महिन्यातील रुग्णसंख्येच्या दुप्पट आहे. तसेच ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. या कालावधीत ४,४६८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.