कोरोना: अकोला जिल्ह्यात ६९ टक्के रुग्ण होम क्वारंटीन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 11:12 AM2020-12-04T11:12:04+5:302020-12-04T11:14:00+5:30
CoronaVirus News रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नातेवाइकांमुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अकोला: जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असून, रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांपैकी जवळपास ६९ टक्के रुग्ण होम क्वारंटीन आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभागातर्फे आवश्यक सर्वच उपाययोजना केल्या जात असल्या तरी नागरिकांची बेफिकिरी घातक ठरू शकते. विदर्भात कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान अकोला पाठोपाठ नागपूर जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढली होती. याच दरम्यान नागपूर जिल्ह्यात बहुतांश रुग्णांना होम क्वारंटीन करण्यात आले होते. या रुग्णांच्या बेफिकिरीमुळे नागपूर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढीचाही वेग वाढल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांंगण्यात आले. हीच स्थिती सध्या अकोला जिल्ह्यात असून, एकूण ॲक्टिव्ह रुग्णांपैकी ६९ टक्के रुग्ण होम क्वारंटीन आहेत. यापैकी काही रुग्णांना कोरोनाचे लक्षणे नाहीत, तर काहींना सौम्य लक्षण आहेत. बेफिकिरीमुळे या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नातेवाइकांमुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा कुटुंबांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.
ही घ्या खबरदारी
नियमित मास्कचा वापर करा
होम क्वारंटीन रुग्णांनी स्वतंत्र खोलीतच राहावे
इतरांशी संपर्क टाळावा
वारंवार हात धुवावे
वयोवृद्धांची घ्या काळजी
होम क्वारंटीन असलेल्या रुग्णांच्या घरात वयोवृद्ध व्यक्ती असल्यास त्यांची विशेष नीगा राखण्याची गरज आहे. विशेष करून रुग्णांनी त्यांच्यापासून लांब राहणे आवश्यक असून, कुठल्याही वस्तूच्या माध्यमातून कोरोना विषाणू त्यांच्या संपर्कात येणार नाही, याची खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
अशी आहे स्थिती
एकूण खाटा - ८३९
ॲक्टिव्ह रुग्ण - ५७२
रुग्णालयांत उपचार घेत असलेले रुग्ण - १८३
होम क्वारंटीन रुग्ण - ३८९
ज्या रुग्णांना लक्षणे नाहीत तसेच त्यांच्या घरी सर्व सुविधा उपलब्ध आहे, अशाच रुग्णाला होम क्वारंटीनची परवानगी दिली जाते. अशा रुग्णांच्या नातेवाइकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. सांगितलेल्या नियमांचे गांभीर्याने पालन केल्यास स्वत:सह इतरांचाही कोरोनापासून बचाव करणे शक्य होईल.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला