कोरोनाचे आणखी १२ रुग्ण वाढले; एकूण रुग्णसंख्या २१८४
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 11:42 AM2020-07-21T11:42:49+5:302020-07-21T11:44:46+5:30
२१ जुलै रोजी कोरोनाचे आणखी १२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.
अकोला : अकोल्यात कोरोनाचा हैदोस सुरूच असून, दिवसेंदिवस या जीवघेण्या आजाराला बळी पडणाऱ्यांची व पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. मंगळवार, २१ जुलै रोजी कोरोनाचे आणखी १२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे एकूण बाधितांची संख्या २,१८४ वर गेली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून मंगळवारी ‘आरटीपीसीआर’ चाचणीचे ११४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १०२ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये पाच महिला व सात पुरुष आहेत. यामध्ये बारगणपुरा अकोट येथील तीन, बोरगाव मंजू येथील तीन, अकोला शहरातील रामनगर येथील दोन, तर उर्वरीत अकोली जहागीर अकोट, जीएमसी, खैर मोहम्मद प्लॉट व जिल्हा कारागृह येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
३२६ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू
आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २१८४ असून, यापैकी १०५ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण १७५४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत ३२६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.