कोरोना : रिकव्हरी रेटमध्ये अकोला जीएमसी राज्यात दुसऱ्या स्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 10:48 AM2020-12-20T10:48:07+5:302020-12-20T10:51:06+5:30
Akola GMC कोविड रुग्णांचा रिकव्हरी रेट ९०.९४ टक्के असून, राज्यात दुसऱ्या स्थानी आहे.
अकोला : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात राज्यातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये महत्त्वाची भूमीका बजावत आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका अहवालानुसार, अकोला जीएमसीतील कोविड रुग्णांचा रिकव्हरी रेट ९०.९४ टक्के असून, राज्यात दुसऱ्या स्थानी आहे. तसेच मृत्युदरही आटोक्यात आणण्यास येथील डॉक्टरांच्या प्रयत्नांना मोठे यश आल्याचे अहवालावरून दिसून येते.
राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून राज्यातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये निरंतर रुग्णसेवा देत आहेत. आतापर्यंत या रुग्णालयांमध्ये ६२ हजार ५४० रुग्णांवर उपचार झाले असून, त्यापैकी ५० हजार ३४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर ११ हजार २२४ रुग्णांचा उपचारामध्ये मृत्यू झाला. अकोला जीएमसीत आतापर्यंत कोविडचे ४ हजार ५२३ रुग्ण दाखल झाले. त्यापैकी चार हजार ९५ रुग्ण बरे झाले. बरे होण्याचे हे प्रमाण ९०.५४ टक्के आहे. या बाबतीत अकोला जीएमसी राज्यात दुसऱ्या स्थानी आहे, तर पहिल्या स्थानी मुंबई येथील कामा रुग्णालय आहे. तसेच मृत्युदर नियंत्रणात आणण्यासही येथील डॉक्टरांना मोठे यश आले आहे. अकोला जीएमसीचा मृत्युदर ८.२० टक्के असून, सर्वांत कमी मृत्युदरामध्ये तिसऱ्या स्थानी आहे.
उशिरा उपचारामुळे मृत्यू
कोविडचे बहुतांश रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात उशिरा दाखल होत असल्याचे दिसून येते. चाचणी उशिरा झाल्याने कोरोनाचे निदानही उशिरा होते. त्यामुळे उपचार सुरू होईपर्यंत रुग्णाची प्रकृती गंभीर होते. अशा परिस्थितीत रुग्णाला वाचविण्यासाठी डॉक्टरांकडून प्रयत्नही केले जातात, मात्र अनेकदा त्यांना अपयश येते.
इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या तुलनेत अकोला जीएमसीची कामगिरी चांगली आहे. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश येत आहे. डॉक्टरांसोबतच नागरिकांनीही कोरोनाला गांभीर्याने घेण्याची गरज आहे. लक्षणे आढळताच कोविडची चाचणी करावी. शिवाय ज्यांना कोरोना होऊन गेला अशा रुग्णांनीही नियमित तपासणी करावी.
- डॉ. कुसुमाकर घोरपडे, प्र.अधिष्ठाता, जीएमसी, अकोला