कोरोना : अकोल्याचा मृत्युदर घसरला, पण विदर्भात अव्वल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 10:31 AM2021-02-21T10:31:44+5:302021-02-21T10:31:58+5:30
CoronaVirus News विदर्भात सर्वात कमी रिकव्हरी रेट ८२.९ टक्के अमरावती, तर ८८.१ टक्के रिकव्हरी रेट अकोला जिल्ह्याचा आहे.
अकोला: गत महिन्याच्या तुलनेत जिल्ह्यातील कोविडचा मृत्युदर ३ टक्क्यांहून घसरून २.८ टक्क्यांवर आला आहे. मात्र, मृत्युदराचा हा आकडा विदर्भात सर्वाधिक असल्याचे चित्र दिसून येते. मृत्युदर कमी झाल्याचा दिलासा असला, तरी कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण लक्षणीय घटले आहे. विदर्भात सर्वात कमी रिकव्हरी रेट ८२.९ टक्के अमरावती, तर ८८.१ टक्के रिकव्हरी रेट अकोला जिल्ह्याचा आहे. वाढती रुग्णसंख्या आणि बरे होण्याचे प्रमाण कमी असल्याने परिस्थिती चिंताजनक होत आहे. सप्टेंबरच्या तुलनेत जानेवारी महिन्यात जवळपास सर्वत्रच कोरोना संसर्गाचा वेग मंदावला होता. मात्र, फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच अकोल्यासह अमरावती, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली. गत आठवडाभरापासून कोरोनाने विदर्भातील अमरावती, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यात कहर केला. दररोज प्राप्त अहवालाच्या ५० टक्के रुग्ण पॉझिटिव्ह येऊ लागल्याने चिंता वाढली. त्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही कमी झाले. विदर्भात सर्वात कमी रिकव्हरी रेट ८२.९ टक्के अमरावती जिल्ह्याचा आहे. या दरम्यान अकोला आणि यवतमाळ जिल्ह्याचा मृत्युदर घसरून २.८ टक्क्यांवर आल्याने थोडा दिलासा मिळाला. मात्र, हा आकडा विदर्भात अव्वल स्थानी असल्याने चिंता वाढली आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनचा धोका लक्षात घेता, प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मागील नऊ महिन्यांत रुग्णसंख्या वाढीमध्ये चढ-उतार झाला, तरी मृत्युदर मात्र ३ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. मध्यंतरी ऑक्टोबर महिन्यात कोरोनाचा मृत्युदर २.१६ टक्क्यांवर आला होता. रुग्णसंख्या वाढीसोबतच मृत्युदर नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागातर्फे आवश्यक प्रयत्न केले जात असले, तरी परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे चित्र आहे.
अशी आहे विदर्भातील स्थिती
जिल्हा - बरे होणारे रुग्ण - मृत्युदर (टक्क्यांमध्ये)
अकोला - ८८.१ - २.८
अमरावती- ८२.९ - १.५
भंडारा - ९६.३ - २.३
बुलडाणा - ९१ - १.६
चंद्रपूर - ९६.८ - २
गडचिरोली - ९८ - १
गोंदिया - ९८.१ - १.२
नागपूर - ९३.४ - २.४
वर्धा - ९३.४ - २.६
वाशिम - ९४ - २.१
यवतमाळ - ९१.७ - २.८
नागरिकांनी कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. कुठलाही आजार अंगावर न काढता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावा. वेळेतच कोविडची चाचणी करावी. पॉझिटिव्ह येताच रुग्णालयात दाखल व्हावे. रुग्णसंख्या वाढ आणि मृत्युदर नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागामार्फत आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.
- डॉ.राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, अकोला