कोरोनाने लग्नासाठीच्या अपेक्षाही बदलल्या...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:41 AM2021-09-02T04:41:42+5:302021-09-02T04:41:42+5:30
गत दीड वर्षापासून कोरोनामुळे लग्नासाठी इच्छुक असलेल्या युवक-युवतींना अडचणींचा सामना करावा लागत आहे. लग्नाचे मुहूर्त असलेल्या काळातच कोरोनाचा उद्रेक ...
गत दीड वर्षापासून कोरोनामुळे लग्नासाठी इच्छुक असलेल्या युवक-युवतींना अडचणींचा सामना करावा लागत आहे. लग्नाचे मुहूर्त असलेल्या काळातच कोरोनाचा उद्रेक होत असल्याने युवक-युवतींची निराशा होत आहे. गतवर्षी ऐन उन्हाळ्यात कोरोनाचा उद्रेक झाला, त्यामुळे इच्छुकांना युवक-युवती बघण्याचा कार्यक्रमही पार पाडता आला नाही, तर हीच स्थिती यंदाही दिसून आली. तरीही काहींनी मोजक्या वरातींच्या उपस्थितीत लग्न सोहळे आटोपले. याच कोरोनामुळे अनेक युवकांना नोकरी गमवावी लागली, तर काहींचे व्यवसाय डुबले. त्यामुळे वधुमंडळींकडून लग्नासाठी अपेक्षाही बदलल्या आहेत. कोणाला खासगी नोकरी करणारा मुलगा नको तर कोणाला दूरचा संबंध नको, अशी परिस्थिती आहे.
या अपेक्षांची पडली भर!
एकवेळ शेतकरी मुलाला टाळले जात होते; परंतु आता अपेक्षांमध्ये शेती विषय आवश्यक आहे.
आता खासगी नोकरीला धोका असल्याने शासकीय नोकरी असलेल्या मुलावर जास्त भर आहे.
कोरोनामुळे नोकरीची श्वाश्वती नसल्याने मुलगीही नोकरी किंवा व्यवसाय करणारी असल्याची मागणी होते.
या अपेक्षा झाल्या कमी!
कोरोनामुळे लग्न समारंभ पार पाडणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या अपेक्षा कमी झाल्या.
आधी पुणे, मुंबई या मोठ्या शहरातील मुलांना प्राधान्य होते. आता खेड्यातील मुलगा चालतो.
कोरोनामुळे ये-जा करण्यासाठी अडचणी येत असल्याने जवळचे स्थळ आल्यास प्राधान्य मिळते.
वधू-वर सूचक मंडळ चालक म्हणतात...
कोरोना काळात वर-वधूंकडून लवकरात लवकर लग्न करण्यासाठी अपेक्षा कमी झाल्या आहेत. काही जण शेती, जमीन असल्यास जास्त भर देत आहेत. शासकीय नोकरीचाही आग्रह धरण्यात येत आहे.
- अर्चना पाटील
एखाद्या मुला-मुलीच्या लग्नाचा योग आल्यास कोरोना काळात कमी खर्च करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. तर मुलाला मोठा पॅकेज असल्यावरही वधू पक्षाकडून जमीन आवश्यक असल्याचे म्हटो जात आहे.
- ॲड. विलास जवंजाळ