कोरोनाने बदलतोय राजकारणाचाही ‘ट्रेण्ड’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 10:22 AM2020-06-21T10:22:24+5:302020-06-21T10:22:33+5:30
कोरोनामुळे राजकारणाचा ट्रेण्डच बदलतोय असे चित्र आहे.
- राजेश शेगोकार
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : आजुबाजुला कार्यकर्त्यांचा गोतावळा, दौऱ्यात गाडयांचा ताफा, दारासमोर चपलांचा ढिग, दिवाणखान्यात, कार्यालयात जमलेली कार्यकर्त्यांची गर्दी, या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात ठेव, कोणाशी हस्तांदोलन कर, कोणाला आलिंगन देत पाठीवर थाप मार ...असे दूष्य कोणत्याही राजकीय नेत्यांच्या अवतीभोवती राहणाऱ्यांना नवे नाही. गेल्या तीन महिन्याच्या काळात मात्र हे चित्र आता बरेच कमी झाले. कमीत कमी कार्यकर्त्यांशी फिजिकल संपर्क आला पाहिजे व उद्देशच सफल झाला पाहिजे हा प्रयत्न राजकीय क्षेत्रात होतांना दिसत आहे अन् त्याला कारणीभूत ठरला तो कोरोना. या कोरोनामुळे राजकारणाचा ट्रेण्डच बदलतोय असे चित्र आहे. गेल्या तीन महिन्यात राजकीय पक्षांनी संघटन पातळीवर व पक्षीय राजकारण कमी केलेले नाही उलट ते आहे त्यापेक्षाही वेगाने सुरू होते फक्त त्याचे माध्यम बदलेले दिसले. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी टेलिकॉन्फरन्सच्या माध्यमातून अकोल्यात बसून त्यांच्या खात्याचा गाडा हाकलला. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी जिल्हाध्यक्षांशी आॅनलाईन संवाद साधला, भाजपने व्हर्चुअल सभा अन् रॅलीचे नियोजन केले, जिल्ह्यातील शहरात, खेड्यात काहीही समस्या असल्यास त्या समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अभिप्राय ही मोहीम सुरू करून या मोहिमेसाठी एक लिंक देण्यात आली असून, त्यावर कोणत्याही समस्यांची माहिती संकलित करण्याचे प्रयत्न सुरू केले. वंचित बहूजन आघाडीनेही अशा साधानांचा एवढा वापर केला की त्यांच्यानावाने फेक अकाऊंटच सुरू झाले. शिवसेनेच्या पदाधिकाºयांशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स केली असाचा प्रकार लहान मोठया संघटना, पक्षाचे विविध सेल यांनीही मोठया प्रमाणात केला.
राजकीय पक्षांच्या अजेंड्यांवरील विषयही बदलले. एरव्ही फळ वाटप, मोठमोठे कार्यक्रम, जंगी सत्कार अशांना पुरता फाटा देऊन त्याची जागा रक्तदान, निर्जंतुकीकरणाचे साहित्य वाटप, रोगप्रतिकार क्षमता वाढविणाºया औषधांचे वितरण यांनी घेतले; मात्र हे सर्व करताना संपर्काची माध्यमे बदलली तरी राजकारणाचा स्वर व सूर तोच होता. अकोल्यात कोरोनासारखे गंभीर व जीवघेणे संकट उभे असतानाही राजकीय पक्षांमध्ये कोरोनाच्या उपाययोजनांबाबत आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरूच आहे, त्यामुळे राजकारणाचा हा ट्रेण्ड बदललेला दिसला तरी स्वभाव बदलला नसल्याचे स्पष्ट होते. अनलॉकची प्रक्रिया सुरू होऊन आता आठ दिवस उलटले, रस्त्यावरची गर्दीही वाढू लागली. या गर्दीसोबतच राजकीय नेत्यांच्या भोवतीचा गराडाही वाढणारच आहे. पाच पंचविस कार्यकर्त्यांना घेऊन नेत्यांची उठबस वाढेल, पुन्हा लहान-मोठे कार्यक्रम सुरू होतील अन् राजकारण पुन्हा आपल्याच वळणावर जाईल, कारण आपल्याकडच्या राजकारणात ‘गर्दी’महत्त्वाची आहे.
माध्यमांवर किती लाईक्स मिळाले, किती व्हीज होते, यापेक्षा किती डोकी भाषणाला हजर होती, याचा प्रभाव जास्त असतो. त्यामुळेच कोरोनावर मात केल्यानंतर आपल्या भोवती राहणारे गर्दीचे वैभव भविष्यातही राहिले पाहिजे, म्हणून कार्यकर्त्यांना बांधून ठेवण्यासाठी, जपण्यासाठी प्रत्येक पक्षाची सारी आॅनलाइन धडपड सुरू आहे.
पक्ष व राजकीय प्रतिष्ठा वाचविण्यासाठी अन् वाढविण्यासाठी ही धडपड योग्यच असली तरी आता खरी धडपड अकोला वाचचिण्यासाठी केली पाहिजे. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस भीषण होत आहे. दररोज रुग्ण वाढत आहेत, मृत्यू तर सरासरी दररोजचा एक असे काहीसे चित्र आहे; मात्र उपाययोजनांबाबत फक्त चर्चांचा काथ्याकुट अन् सूचनांचा पाऊस यापलिकडे काही बदल नाही. व्हेंटिलेटर कमी, अपुºया खाटा, सुविधांची वाणवा या समस्या दूर करण्यासाठी राजकारण्यांनी आपली पक्षीय भूमिका बाजूला ठेवून दबाव गट केला तर नवा राजकीय ट्रेण्ड सर्व राज्यासाठी दिशादर्शक ठरेल; पण लक्षात कोण घेते?
बदल हा राजकारणाचा स्थायीभाव आहे. त्यामुळेच राजकारण हे सतत प्रवाही असते. अलीकडच्या काळात ते एवढे प्रवाही झाले आहे की, आयुष्यभर जे तत्व, मूल्य व निष्ठा जोपासण्याची शपथ घेत कार्यकर्त्यांची मोठी फळी उभारणारेही रातोरात आपल्या तत्वांना तिलांजली देत सत्तेसोबत सारीपाट लावून विचारसरणीतही चटकन बदल घडतो, हे दाखवून देतात. अशा नेत्यांच्या कार्यकर्त्यांना मात्र कोणता झेंडा घेऊ हाती, असे म्हणण्याची वेळ येते. कोरोनाने मात्र राजकारणाचे स्वरूपच बदलून टाकले. संवाद अन् संपर्काची माध्यमे बदलली, त्यामधून राजकारणाची प्रक्रियाही ‘व्हर्च्युअल’ होईलही; पण ‘गर्दी’ हाच राजकारणाचा श्वास आहे, म्हणूनच हा बदलही क्षणिकच असेल.