Corona Cases in Akola : महिनाभरात १५,६१८ जणांनी कोरोनाला हरविले
By atul.jaiswal | Published: June 1, 2021 10:42 AM2021-06-01T10:42:22+5:302021-06-01T10:45:19+5:30
Corona Cases in Akola: महिनाभरात रुग्णालय व गृहविलगीकरणात असलेल्या तब्बल १५,६१८ जणांनी कोरोनावर मात केल्याचे आशादायी चित्र दिसून आले आहे.
- अतुल जयस्वाल
अकोला : कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी गत दीड महिन्यापासून लागू असलेल्या कठोर निर्बंधाचे सुपरिणाम आता दिसत असून, मे महिन्याच्या उत्तरार्धात जिल्ह्यात कोरोनाचा आलेख घसरणीला लागला आहे. १ ते ३१ मे या कालावधीत तब्बल १५, ६१८ जण कोरोनामुक्त झाले, तर १४,९५४ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली.
गतवर्षी एप्रिल महिन्यात शिरकाव केलेल्या कोरोनाने संपूर्ण जिल्ह्यावर पाश आवळला असून, यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धापासून सुरू झालेली दुसरी लाट अनेकांसाठी कर्दनकाळ ठरली. एप्रिल व मे महिन्याच्या पूर्वार्धात कोरोनाने जिल्ह्यात कहरच केला. रुग्णालयांमध्ये खाटाच शिल्लक नसल्याने संपूर्ण आरोग्य यंत्रणा हतबल झाली होती. कोरोना संसर्गाची ही साखळी खंडित करण्यासाठी ब्रेक द चेनअंतर्गत कठोर निर्बंध लादण्यात आल्यानंतर, आता हळूहळू कोरोना संसर्गाचा आलेख उतरणीला लागला आहे. १ मे ते ३१ मे या कालावधीत नव्याने बाधित होणाऱ्यांच्या तुलनेत कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. या महिनाभरात रुग्णालय व गृहविलगीकरणात असलेल्या तब्बल १५,६१८ जणांनी कोरोनावर मात केल्याचे आशादायी चित्र दिसून आले आहे.
३६७ जणांचा मृत्यू
मे महिन्यात जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातल्याने मोठ्या संख्येने रुग्ण मृत्यूच्या दाढेत गेले. या महिनाभरात तब्बल ३६७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १०६९ जणांचा मृत्यू झाला आहे. नव्याने बाधित होणाऱ्यांची संख्या घटत असली, तरी दररोज होणारे मृत्यू चिंता वाढविणारे आहेत.
कडक निर्बंधांचे चांगले परिणाम
कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी लागू असलेल्या कडक निर्बंधामुळे नागरिकांची गैरसोय झाली असली, तरी या निर्बंधांमुळेचे कोरोना संसर्गाचा वेग कमी करण्यात यश मिळाले आहे. बाजारपेठांमध्ये दिवसभर होणारी गर्दी नियंत्रणात आल्याने कोरोनाची साखळी खंडित होत आहे.
बेफिकिरी परवडणारी नाही
कोरोना संसर्गाचा वेग मंदावत असला, तरी मृत्यूसत्र सुरूच आहे. रुग्णसंख्या घटत असल्याने नागरिकांमध्ये बेफिकिरीवृत्ती जागृत झाली, तर पुन्हा एकदा कोरोनाचा आलेख उंचावण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना नियमांचे पालन केल्यास दुसरी लाट पूर्णपणे नियंत्रणात येऊ शकते.