Corona Cases in Akola : मृत्यूला ब्रेक, रुग्णसंख्या वाढही नियंत्रणात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 10:53 AM2021-08-01T10:53:55+5:302021-08-01T10:54:03+5:30
Corona Cases in Akola: चारही पॉझिटिव्ह अहवाल आरटीपीसीआर चाचणीतील असून रॅपिड ॲन्टिजन चाचणीत एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.
अकोला : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढ नियंत्रणात आली आहे. शनिवारी केवळ ४ अहवाल पॉझिटिव्ह आले असून एकाही मृत्यूची नोंद करण्यात आली नाही. रुग्णसंख्या वाढीवर नियंत्रणासाेबतच मृत्यूलाही ब्रेक लागल्याने अकोलेकरांना मोठा दिलासा मिळाला; मात्र संकट अजूनही कायम असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. शनिवारी प्राप्त अहवालानुसार, ४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. चारही पॉझिटिव्ह अहवाल आरटीपीसीआर चाचणीतील असून रॅपिड ॲन्टिजन चाचणीत एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत ५७ हजार ७६४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी १ हजार १३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ५६ हजार ५७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत कोरोनाच्या ५३ रुग्णांवर उपचार सुरू असून यापैकी बहुतांश रुग्ण गृह विलगीकरणात आहेत.
तालुकानिहाय रुग्णसंख्या
तालुका - रुग्णसंख्या
पातूर - ०२
बार्शीटाकळी - १
अकोला मनपा - १
बेफिकिरी ठरू शकते घातक
शहरातील बाजारपेठ पूर्ववत सुरू झाली असून नागरिकांची गर्दी देखील वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये या अनुषंगाने शासनाने काही नियमही घालून दिले आहेत; मात्र व्यापाऱ्यांसह नागरिकांकडून नियमांचे पालन होताना दिसत नाही. प्रतिष्ठानांमध्ये विनामास्क प्रवेश दिला जात असून इतरांपासून सुरक्षित अंतरही राखले जात नाही. तसेच ऑटोरिक्षामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक सुरू असून मास्कचा वापरही होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. ही बेफिकिरी कोरोनाला निमंत्रण देणारी आहे.