कोरोनामुळे ‘एचआयव्ही’ तपासणी शून्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 10:27 AM2020-07-14T10:27:25+5:302020-07-14T10:27:45+5:30
अकोला : गत काही वर्षात लोकांमध्ये ‘एचआयव्ही’बद्दल जनजागृती झाल्याने अनेक जण स्वत:हून एचआयव्ही तपासणीसाठी एआरटी केंद्रावर जाऊ लागले. त्यामुळे ...
अकोला : गत काही वर्षात लोकांमध्ये ‘एचआयव्ही’बद्दल जनजागृती झाल्याने अनेक जण स्वत:हून एचआयव्ही तपासणीसाठी एआरटी केंद्रावर जाऊ लागले. त्यामुळे तपासण्यांचे प्रमाणही वाढले; परंतु कोरोनामुळे अनेकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्याचा विपरीत परिमाम एचआयव्हीच्या तपासण्यांवरही झाला आहे. गत तीन महिन्यात केवळ गर्भवतींच्या नियमित एचआयव्ही तपासण्या झाल्यात, तर स्वत:हून येणाऱ्या रुग्णांची संख्या खूपच कमी झाली आहे.
कोरोनाच्या भीतीमुळे शासकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची संख्या केवळ दहा टक्क्यांवर आली आहे. इतर रुग्णांसोतच कोरोनाची ही भीती एचआयव्ही तपासणीसाठी एआरटी सेंटरवर जाणाऱ्यांमध्येही मोठ्या प्रमाणात असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळेच गत वर्षीच्या तुलनेत यंदा एप्रिल ते जून या कालावधीत एचआयव्ही तपासणीसाठी येणाºया रुग्णांची संख्या खूपच कमी झाल्याची माहिती एआरटी सेंटरवरील अधिकाºयांनी दिली. शिवाय, या वातावरणात सामूहिक जनजागृतीवरदेखील परिणाम झाल्याने अनेकांनी स्वत:हून एचआयव्हीची तपासणी करण्यास टाळल्याचे वास्तव आहे.
जनजागृती कार्यक्रमही ठप्प!
शाळा, महाविद्यालयात आरोग्य यंत्रणेमार्फत एचआयव्ही संदर्भात जनजागृती मोहीम राबविली जाते. शिवाय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्याही एचआयव्ही चाचण्या केल्या जातात; परंतु कोरोनाच्या फैलावामुळे या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक जनजागृती कार्यक्रमदेखील ठप्प पडले आहेत.
परजिल्ह्यातून येणाºयांचे प्रमाणही घटले
एचआयव्हीच्या तपासणीसाठी वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील बहुतांश लोक अकोल्यात यायचे; परंतु लॉकडाऊनमुळे अशा लोकांचे तपासणीसाठी येण्याचे प्रमाणही घटले आहे.