कोरोना नियंत्रणात; अकोलेकरांना आता डेंग्यू, मलेरियाचा ताप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:20 AM2021-09-11T04:20:26+5:302021-09-11T04:20:26+5:30
मागील दोन महिन्यांत जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जागोजागी पाण्याची डबकी साचून कीटकजन्य आजारांचा फैलाव वाढला आहे. डेंग्यूची लक्षणे असलेले अनेक ...
मागील दोन महिन्यांत जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जागोजागी पाण्याची डबकी साचून कीटकजन्य आजारांचा फैलाव वाढला आहे. डेंग्यूची लक्षणे असलेले अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. खासगी डॉक्टरांकडून रक्ताच्या चाचणीनंतर डेंग्यूसदृश्य,असा रिपोर्ट देऊन रुग्णांवर उपचार होत आहेत तर दुसरीकडे शासनमान्य असलेल्या चाचण्यांकडे शासनाची पाठ असल्याचे दिसून येत आहे. परिणामी जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांत केवळ पाच रुग्ण यंत्रणेला आढळले आहेत. डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या पाहता हा आकडा खूप मोठा असू शकतो, असे खासगी डॉक्टरांकडून सांगण्यात येते. मात्र डेंग्यूच्या निदानासाठी शासनाकडून एलायझा या चाचणीला खात्रीशीर धरल्या जाते. या चाचण्यांचे प्रमाण कमी असल्याचे लक्षात येते. खासगी रुग्णालयांमध्ये डेंग्यूसदृश रुग्णाच्या एनएस १ आणि आयजीएम, आयजीजी या कार्ड टेस्ट केल्या जातात. यातून आलेल्या रिपोर्टनुसार उपचार केले जातात. शासनाकडून एलायझा या चाचणीला खात्रीशीर धरल्या जाते. या चाचणीत संदिग्धाच्या रक्ताचा नमुना व्हीआरडीएल प्रयोगशाळेत तपासला जातो.
डेंग्यूचा फैलाव वाढण्याचा धोका
गेल्या तीन ते चार दिवसांत झालेल्या पावसामुळे अकोला महापालिकेच्या हद्दीत असणार कळ्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. या पाण्यामधून डासोत्पत्ती वाढून डेंग्यूचा फैलाव वाढण्याचा धोका आहे. मात्र, प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना अद्याप करण्यात आल्या नाहीत.
डेंग्यूची लक्षणे
अचानक उच्च-ताप येणे, तीव्र डोकेदुखी, मळमळणे, डोळ्यांच्या मागे वेदना होणे, सांधेदुखी होणे, अती थकवा येणे, शारीरिक वेदना होणे, भूक कमी लागणे, त्वचेवर पुरळ येणे यांचा समावेश होतो. ताप व इतर लक्षणे एक आठवडे टिकतात.
मलेरियाची लक्षणे
ताप, थंडी जाणवणे, स्नायूदुखी, अंगदुखी, डोकेदुखी उलट्या, जुलाब, खोकला, कावीळ आणि डोळे खूप निस्तेज होणे. हुडहुडी भरून थंडी वाजणे आदी.
आठ महिन्यांत ६० हजार चाचण्या
आरोग्य यंत्रणेच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील प्राथमिक आराेग्य स्तरावर आणि शासकीय रुग्णालयांमध्ये मलेरियाची तपासणी सुरू आहे. जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत जिल्ह्यात सुमारे ६० हजार लोकांच्या चाचण्या झाल्याची माहिती आहे. यामध्ये मलेरियाचे तीस रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत.