कोरोना नियंत्रण हाच प्राधान्यक्रम; अकरा अधिकाऱ्यांची 'टास्क फोर्स '
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 05:16 PM2020-03-30T17:16:15+5:302020-03-30T17:16:29+5:30
या समितीत एकूण ११ अधिकाऱ्यांचा समावेश असून, त्यांनी ती जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश दिले आहेत.
अकोला : कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या पृष्ठभूमीवर नागरिकांना द्यावयाच्या अत्यावश्यक सेवा- सुविधांवर नियंत्रण ठेवून त्यांचे नियमन करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हा प्रशासनाचा टास्क फोर्स गठित केल्याचा आदेश निर्गमित केला आहे. या समितीत एकूण ११ अधिकाऱ्यांचा समावेश असून, त्यांनी ती जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश दिले आहेत.
या समितीत अतिरिक्तजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्याकडे आरोग्य विभागाशी संबंधित आराखडा तयार करणे, जिल्हा आरोग्य यंत्रणा समन्वय, रक्ताची उपलब्धता, औषध पुरवठा सुरळीत राखून साठेबाजी रोखणे, खासगी डॉक्टर्सचे दवाखाने सुरू ठेवणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी कलम १४४ च्या अंमलबजावणीसंदर्भात जिल्हा पोलीस दलाशी समन्वय, वाहने अधिग्रहण, मंत्रालयाशी समन्वय, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे संचालन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले व जिल्हा पुरवठा अधिकारी बी.एस. काळे यांनी जीवनावश्यक वस्तू, किराणा माल, भाजीपाला, पेट्रोल डिझेल वितरण, गॅस सिलिंडर उपलब्धता, शिवभोजन योजना अंमलबजावणी इ. जबाबदाºया सोपविण्यात आल्या आहेत.
रोहयो उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्याकडे सेवाभावी संस्थांचे व्यवस्थापन, घरकामगार, आॅटोरिक्षाचालक, खासगी वाहन चालक आदींबाबतचे प्रश्न व व्यवस्था, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सदाशिव शेलार यांच्याकडे वाहतूक व्यवस्था, कामगारांसंदर्भातील प्रश्न, उपजिल्हाधिकारी महसूल यांच्याकडे कृषी विषयक बाबी, पाणी पुरवठा व वीज पुरवठा, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दौड विविध विभागांशी समन्वय राखून माहिती संकलन करणे, जनसंपर्क अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी माध्यमांशी समन्वय राखून जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या उपाययोजनांची माहिती माध्यमांना देणे, प्रसिद्धीबाबत उपाययोजना करणे, जिल्हा प्रशासन अधिकारी श्रीमती टवलारे यांनी नगरपालिका क्षेत्रातील उपाययोजनांचे नियमन करणे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी नितीन चौधरी जिल्हा संपर्क यंत्रणा सुरळीत ठेवणे याप्रमाणे जबाबदाºयांचे वाटप करण्यात आले आहे.