कोरोना संकट : अखंडीत वीजपुरवठ्याला महावितरणचे प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 06:40 PM2020-03-24T18:40:09+5:302020-03-24T18:43:39+5:30
अभियंता व कर्मचारी सुरळीत वीजपुरवठ्याला प्राधान्य देत कर्तव्य बजावत आहेत.
अकोला: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना म्हणून राज्यासह अकोला,वाशिम आणि बुलढाणा जिल्हा लॉकडाऊन करण्यात आले असताना या काळातही महावितरणच्या अकोला परिमंडळाची यंत्रणा अत्यावश्यक असलेली वीज सेवा अखंडित देण्यासाठी सज्ज आहे. आरोग्याची योग्य खबरदारी घेऊन अभियंता व कर्मचारी सुरळीत वीजपुरवठ्याला प्राधान्य देत कर्तव्य बजावत आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘वर्क फ्रॉम होम’चा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे ऊजार्मंत्री नितीन राऊत यांनी दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे महावितरणकडून विविध उपाययोजनांसह वीजपुरवठ्याच्या अत्यावश्यक सेवेसाठी नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये सुरळीत वीजपुरवठ्याला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. सरकारी कार्यालयांत ५ टक्के उपस्थितीची अंमलबजावणी करण्यात येत असली तरी प्रामुख्याने अभियंता आणि तांत्रिक कर्मचारी (जनमित्र) सुरळीत वीजपुरवठ्यासाठी सज्ज आहेत. प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावणाऱ्या अभियंता व तांत्रिक कर्मचाº्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच दुरुस्तीच्या कामासाठी जाताना अभियंता व जनमित्रांनी स्वत:चे ओळखपत्र सोबत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो तत्परतेने पूर्ववत करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र काही गंभीर तांत्रिक बिघाडामुळे वेळ लागल्यास नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरण अकोला परिमंडळाकडून करण्यात येत आहे.
ग्राहकांनी आॅनलाईन वीज बिल भरावे
महावितरण कोव्हीड-१९ या विषाणूच्या संकट काळातही अखंडित वीज पुरवठा करण्यास बांधिल आहे. पण,या काळात वीज ग्राहकांनी मोबाईल एप तसेच महावितरणच्या संकेत स्थळाला भेट देऊन आॅनलाईन वीज बिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरण अकोला परिमंडळाकडून करण्यात येत आहे.
तक्रार निवारणासाठी करा संपर्क!
सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत वीजग्राहकांनी वीजपुरवठ्यासंबंधीच्या तक्रारी किंवा अन्य सेवेसाठी महावितरणच्या स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या अकोला जिल्हा - ७८७५७६३३३९, बुलढाणा जिल्हा - ७८७५७६३४८५ ,वाशिम जिल्हा - ७८७५७६३२७६ या जिल्हा दैनंदिन सनियंत्रण कक्षासोबत अकोला परिमंडळाच्या ७८७५७६३३५० या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेचमहावितरणच्या १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ किंवा १९१२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.