यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:14 AM2021-07-01T04:14:31+5:302021-07-01T04:14:31+5:30
दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोनामुळे शासनाने संपूर्ण कार्यक्रमावर निर्बंध घातले आहे. त्यामुळे संपूर्ण गणेश मंडळ व मूर्तिकारामध्ये नाराजीचा सूर ...
दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोनामुळे शासनाने संपूर्ण कार्यक्रमावर निर्बंध घातले आहे. त्यामुळे संपूर्ण गणेश मंडळ व मूर्तिकारामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रला गणेशोत्सवाचे वेध लागले असून, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही उत्सवावर कोरोनाचे विघ्न कायम आहे. त्यामुळे शासनाकडून गणेशोत्सवासंदर्भात नवीन नियमावली जाहीर करण्यात आलेल्या आहेत. या वर्षी गणेशोत्सव थाटात व जल्लोषात साजरा होईल, अशी आशा सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना होती. मात्र, कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे त्यावर पाणी फेरल्या गेले. यंदा गणेशोत्सवासाठी गणपती मूर्तीच्या उंचीवर बंधने नको, अशी विनंती सार्वजनिक गणेश मंडळांनी शासनाकडे केली होती, पण राज्य शासनाने गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहे. त्यामुळे गणेश मूर्तींची उंची ४ फूट व घरगुती मूर्तीची उंची २ फूट अशी मर्यादा राज्य शासनाने ठरवून दिली आहेत. गणेश मूर्ती बसविण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. शासनाने कोणतेही निश्चित धोरण जाहीर न केल्याने गणेशमूर्ती तयार करण्याचे कामही अद्यापही सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे शासनाने तत्काळ धोरण जाहीर करावे, असे आवाहन सार्वजनिक गणेश मंडळांनी शासनाकडे केली आहे.