कोरोना कमी होतोय; वीकेंडचे निर्बंध हटणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 10:33 AM2021-07-29T10:33:02+5:302021-07-29T10:34:12+5:30
When will the weekend restrictions be lifted : लॉकडाऊनमुळे नुकसान सोसाव्या लागणाऱ्या व्यापाऱ्यांची आर्थिक स्थिती सावरली नाही.
अकोला : गत दीड महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे; मात्र जिल्ह्यात शनिवार व रविवारी निर्बंध कायम आहे. आधीच लॉकडाऊनमुळे नुकसान सोसाव्या लागणाऱ्या व्यापाऱ्यांची आर्थिक स्थिती सावरली नाही. त्यात वीकेंडचे निर्बंध अद्यापही न हटल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. त्यामुळे वीकेंडचे व दररोज सायंकाळी चारपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचे निर्बंध हटणार कधी, असा प्रश्न विचारला जात आहे. कोरोनाच्या काळात व्यापाऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. पहिल्या लाटेत नुकसान सोसावे लागल्यानंतर दुसऱ्या लाटेने व्यापाऱ्यांचे पार कंबरडे मोडले आहे. जिल्ह्यात अद्यापही निर्बंध कायम असून, सायंकाळी चारपर्यंत दुकाने उघडण्यास परवानगी आहे. तसेच शनिवार, रविवार वीकेंडचे निर्बंधही कायम आहे; मात्र जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. दिवसाला केवळ पाच-सहा रुग्ण पाॅझिटिव्ह येत आहे. यासोबत मृत्यूचे प्रमाणही घटले आहे; परंतु जिल्ह्यात अद्यापही वीकेंडचे व सायंकाळी चारपर्यंत निर्बंध कायम असल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे. रुग्णसंख्या घटल्याने वीकेंडचे निर्बंध हटविण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे.
बेरोजगारीचे संकट गडद
कोरोनामुळे सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहे. तसेच या व्यवसायावर अवलंबून असलेले कामगारही अडचणी आले आहे. व्यवसाय होत नसल्याने जास्त अर्थचक्र कोलमडले असून, जास्त कामगारांना कामावर ठेवण्याची गरज व्यावसायिकांना भासत नाही. त्यामुळे बेरोजगारीचे संकट आणखी गडद झाले आहे.
खरंच गरज आहे का?
शहरात इतर दिवसांप्रमाणे शनिवार, रविवारीदेखील गर्दी दिसून येते. तसेच दररोज सायंकाळी रस्त्यावर वाहनांची वर्दळ असतो. आता रुग्णसंख्याही कमी झाली आहे. त्यामुळे निर्बंधांची खरंच गरज आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शनिवार, रविवारी सुटी असल्याने ग्राहक याच दिवशी खरेदीसाठी येतात. या दोन दिवसांमध्ये चांगला व्यवसाय होतो. आता कोरोना रुग्णांची संख्याही कमी होत आहे. त्यामुळे वीकेंड निर्बंधांची मुळीच आवश्यकता दिसून येत नाही.
- भीकमचंद अग्रवाल, इलेक्ट्रॉनिक्स व्यावसायिक
जिल्ह्यात रुग्ण कमी झाले आहे. बहुतांश नागरिकांचे लसीकरणही झाले आहे. त्यामुळे निर्बंध पूर्णपणे हटविण्याची गरज आहे. वीकेंड निर्बंधांचीही गरज नाही. शासनाने हे सर्व निर्बंध हटविणे आवश्यक आहे.
- किशोर मांगटे, कपडा व्यावसायिक
निर्बंध असल्याने छोटे व्यावसायिक अडचणीत आले आहे. अपेक्षित व्यवसायही होत नाही. त्यामुळे प्रशासनाने किमान सायंकाळची वेळ सातपर्यंत करणे आवश्यक आहे.
- रिषी जाधवाणी, फुटवेअर व्यावसायिक
निर्बंधांमुळे फळ व्यवसाय मंदावला आहे. फळ व्यावसायिकांना आर्थिक नुकसान होत आहे. सायंकाळी चारनंतर फळांची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्याची गरज आहे. तसेच वीकेंड निर्बंधही हटवावी.
- मुजाहिद खान, फळ व्यावसायिक