अकोला जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा कहर : आठवडाभरात ५४६ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 12:24 PM2021-02-15T12:24:11+5:302021-02-15T12:24:18+5:30

CoronaVirus in akola डिसेंबर २०२०मध्ये कमी झालेला संसर्गाचा दर वाढला आहे.

Corona devastation in Akola district: 546 positives in a week | अकोला जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा कहर : आठवडाभरात ५४६ पॉझिटिव्ह

अकोला जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा कहर : आठवडाभरात ५४६ पॉझिटिव्ह

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर पुन्हा दिसू लागला आहे. आठवडाभरात जिल्ह्यात ५४६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, चौघांचा मृत्यू झाला आहे. डिसेंबर २०२०मध्ये कमी झालेला संसर्गाचा दर वाढला आहे. गत आठवड्यात संसर्गाचा दर १७.१८ टक्के होता.

जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. डिसेंबर २०२० पर्यंत कोविडचा संसर्ग दर घसरला होता. त्यामुळे रुग्णसंख्याही कमी झाली होती. नव्या वर्षात संसर्गाचा दर पुन्हा वाढू लागला आहे. दररोज सरासरी १० ते २० अहवाल पॉझिटिव्ह यायचे, ते जानेवारीमध्ये वाढून २५ ते ३०वर आले होते. फेब्रुवारी महिन्यात पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. गत आठवडाभरात कोरोनाने जिल्ह्यात पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. ८ फेब्रुवारीला जिल्ह्यात केवळ २० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता, मात्र त्यानंतर रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होताना दिसू लागले. ८ ते १४ फेब्रुवारी या आठवड्यात सर्वाधिक १२७ रुग्ण १३ फेब्रुवारी राेजी आढळून आले. वाढत्या रुग्णसंख्येने जिल्हा प्रशासन आणि आराेग्य विभागाची चिंता वाढविली आहे. यासाठी अकोलेकरांची बेफिकिरी मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. वेळीच सतर्कता न बाळगल्यास जिल्ह्यातील स्थिती पुन्हा सप्टेंबर २०२० सारखी होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्यविभागातर्फे करण्यात आले आहे.

 

मृत्यूचा दर ३ टक्क्यांवर

जिल्ह्यात कोराेनाचा रुग्णदर वाढत असला तरी मृत्यूचा दर कमी होताना दिसून येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे ३४२ जणांचा मृत्यू झाला. गत महिन्यापर्यंत कोरोनाचा हा मृत्युदर ३.२ टक्क्यांवर होता, तो आता घसरून तीन टक्क्यांवर आला आहे.

 

 

जिल्ह्यात कोविड रुग्णसंख्या वाढ होत आहे. त्यावर अंकुश लावण्यासाठी प्रत्येकाने स्वत: खबरदारी घेण्याची गरज आहे. कोरोनाचे प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केल्यास पॉझिटिव्ह येण्याची शक्यता कमी असते. नागरिकांनी नियमित मास्कचा वापर करावा, इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवावे तसेच नियमित हात धुवावे या नियमांचे पालन करावे.

- डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, अकोला

Web Title: Corona devastation in Akola district: 546 positives in a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.