३७ पॉझिटिव्ह बाळंतिणींच्या एकाही शिशूला कोरोनाची बाधा नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 10:07 AM2020-06-13T10:07:13+5:302020-06-13T10:07:26+5:30
खबरदारीमुळे एकाही नवजात शिशूला कोरोनाची बाधा झाली नसल्याने आरोग्य यंत्रणेला मोठे यश मिळाले आहे.
- प्रवीण खेते
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गत महिनाभरात जिल्ह्यात ३७ गर्भवतींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे या गर्भवतींच्या प्रसूतीनंतर नवजात शिशूंना कोरोनापासून वाचविण्याचे मोठे आवाहन आरोग्य विभागासमोर होते; मात्र जिल्हा स्त्री रुग्णालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या विशेष खबरदारीमुळे एकाही नवजात शिशूला कोरोनाची बाधा झाली नसल्याने आरोग्य यंत्रणेला मोठे यश मिळाले आहे.
जिल्ह्यात विशेषत: शहरात कोरोनाचा कहर सुरू झाल्याने कंटेनटमेन्ट झोनची संख्याही वाढू लागली. त्यामुळे या भागातून येणाऱ्या रुग्णांवर विशेष लक्ष दिले जाऊ लागले होते. दरम्यान, अशा भागातून येणाºया गर्भवतींमध्येही कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने जिल्हा स्त्री रुग्णालयाने खबरदारी म्हणून त्यांच्यासाठी स्वतंत्र वॉर्डाची निर्मिती केली. अशा गर्भवतींचे प्रसूतीपूर्वीच स्वॅब घेणे सुरू केले. त्यात काही महिलांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना तत्काळ सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले. ही संख्या वाढू लागल्याने मध्यंतरी आरोग्य यंत्रणेतर्फे सर्वोपचार रुग्णालयातील स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विभाग कोरोना पॉझिटिव्ह गर्भवतींसाठी आरक्षित करण्यात आला. गत महिनाभरात या ठिकाणी जवळपास ३७ पॉझिटिव्ह गर्भवतींची प्रसूती करण्यात आली. यातील १४ गर्भवतींचे सिझर झाले असून, अशा परिस्थितीत संक्रमणाचा जास्त धोका होता; मात्र विशेष बाब म्हणजे यातील एकाही नवजात शिशूला कोरोनाची बाधा झाली नसून, बाळंतिणीसह शिशूंची प्रकृती उत्तम असल्याचे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोरोना होऊ नये म्हणून शिशूंची विशेष काळजी
वृद्धांप्रमाणेच नवजात शिशूंचीही रोग प्रतिकारकशक्ती कमी असते. त्यामुळे माता पॉझिटिव्ह असताना नवजात शिशूंनाही कोरोनाचा धोका जास्तच असतो. अशा परिस्थितीत शिशूंना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी आरोग्य यंत्रणेद्वारे विशेष काळजी घेण्यात आली.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पॉझिटिव्ह मातांपासून शिशूंना आणि वैद्यकीय कर्मचाºयांना कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. आतापर्यंत एकाही नवजात शिशूला कोरोनाची बाधा झाली नाही, हे मोठे यश आहे.
- डॉ. श्यामकुमार शिरसाम,
वैद्यकीय अधीक्षक,
जीएमसी, अकोला
स्वत:चाही केला कोरोनापासून बचाव
पॉझिटिव्ह गर्भवतींची प्रसूती करताना डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाºयांचा थेट संपर्क येतो. त्यामुळे जवजात शिशूंसह स्वत:चाही कोरोनापासून बचाव करण्याचे मोठे आव्हान डॉक्टर व कर्मचाºयांवर होते. ही जबाबदारी चोख पार पाडत डॉक्टरांनी स्वत:चा कोरोनापासून बचाव करत एकाही शिशूला कोरोनाची बाधा होऊ दिली नाही, हे विशेष.