Corona Efect : महाविद्यालये बंद; परीक्षेबद्दल निर्णय नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 12:01 PM2020-03-31T12:01:37+5:302020-03-31T12:01:44+5:30
महाविद्यालय १४ एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याने परीक्षादेखील लांबणार का, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये शंका आहे.
अकोला : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित सर्वच महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आली होती; परंतु बंदचा हा कार्यकाळ आता १४ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आला आहे. विद्यापीठांतर्गत घेण्यात येणाऱ्या महाविद्यालयीनपरीक्षांचे नियोजन १५ एप्रिलपासून होते; परंतु महाविद्यालय १४ एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याने परीक्षादेखील लांबणार का, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये शंका आहे. विद्यापीठाने अद्याप परीक्षेबद्दल नव्याने निर्णय घेतला नाही.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित सर्वच महाविद्यालये १४ एप्रिलपर्यंत बंद राहणार असले, तरी महाविद्यालयातील सर्वच शिक्षक, संशोधक, अधिकारी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहून घरूनच संबंधित विभागाचे कामकाज करावे लागणार आहे. अत्यावश्यक कार्यालयीन कामकाजासाठी संबंधित शिक्षक, संशोधक, अधिकारी व शिक्षकेतर कर्मचाºयांना वरिष्ठांच्या सूचनेनुसार कार्यालयात हजर व्हावे लागणार आहे. या संदर्भात विद्यापीठाने सर्वच महाविद्यालयांना सूचना दिल्या आहेत. तसेच अत्यावश्यक सेवेत मोडणाºया आरोग्य केंद्र, सुरक्षा विभाग, अभियांत्रिकी विभाग, पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा व इतर सेवा पुरविणाºया प्रशासकीय विभाग प्रमुखांनी आवश्यक निर्णय घेण्याचेही विद्यापीठाने सूचित केले आहे.