‘कोरोना’चा फटका: रक्त संकलन घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 05:29 PM2020-05-23T17:29:24+5:302020-05-23T17:29:29+5:30
रक्ताची गरज भागविण्यासाठी रक्तपेढ्यांचे लक्ष आता ग्रामीण भागाकडे लागून आहे.
अकोला : वाढते तापमान आणि कोरोनाचा प्रादुर्भाव, यामुळे जिल्ह्यातील रक्त संकलन घटले आहे. रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा दुष्काळ पडल्याने अनेक शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. रक्ताची गरज भागविण्यासाठी रक्तपेढ्यांचे लक्ष आता ग्रामीण भागाकडे लागून आहे.
गत २० ते २२ दिवसांपासून जिल्ह्यात विशेषत: महापालिका क्षेत्रात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाबाधितांचा आकडा ३६२ वर पोहोचला आहे, तर दरदिवसाआड एकाचा कोरोनामुळे बळी जात आहे. या भयावह परिस्थितीत रक्तदातेही रक्तदान करण्यास टाळत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. मध्यंतरी जनजागृतीसह रक्त संकलनाच्या विविध पद्धतींचा अवलंब केल्याने रक्तदात्यांनीही प्रतिसाद देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे शहरातील महत्त्वाच्या रक्तपेढ्यांमध्ये मुबलक रक्तसाठा उपलब्ध होता; परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि उन्हाचा तडाखा यामुळे अनेकजण रक्तदान करण्यास टाळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मर्यादित रक्तसाठा असल्याने डॉक्टरही अत्यावश्यक असेल, तरच रुग्णांवर शस्त्रक्रिया करीत आहेत. त्यामुळे रक्ताची गरज कमी झाली आहे; मात्र दुसरीकडे आवश्यकतेच्या तुलनेत रक्त संकलन घटले होते. त्यामुळे रक्तपेढ्यांसह रुग्णालयांचीही चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत रक्तपेढ्या रक्त संकलनासाठी ग्रामीण भागात शिबिर घेण्याचा विचार करीत आहेत. त्यासाठी ग्रामीण भागातील रक्तदात्यांनाही शिबिरासाठी आवाहन केले जात आहे.