कोरोना: आठवडी बाजार बंद असल्याने शेतकरी चिंतित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:34 AM2021-03-13T04:34:19+5:302021-03-13T04:34:19+5:30
वाडेगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा, आठवडी बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करण्यास ...
वाडेगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा, आठवडी बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करण्यास व्यापारी नकार देत आहेत. त्यामुळे वाडेगाव परिसरातील टरबूज उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. काही शेतकरी गावोगावी फिरून टरबुजाची विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे.
वाडेगाव परिसरात यंदा टरबुजाची पेरणी मोठ्या प्रमाणात आहे. सद्यस्थितीत टरबूज विक्रीला आले आहेत; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ बंद असल्याने शेतकऱ्यांकडून टरबुजाची बेभावाने विक्री केल्या जात आहे. वाडेगाव, दिग्रस बु. परिसरात गेल्यावर्षी बऱ्यापैकी पावसाळ्यात पाऊस झाल्याने यंदा शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीत भरमसाठ जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मुळे यंदा शेतात चांगले टरबुजाचे उत्पन्न होईल, अशी आशा ठेवून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टरबुजाची पेरणी केली. गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ बंद असल्याने शेतकरी बेभाव टरबुजाची विक्री करीत आहेत. जास्त नफा मिळण्यासाठी अनेक शेतकरी चारचाकी घेऊन परिसरातील गावागावात टरबुजाची विक्री करीत आहेत.
-------------------
टरबुजाची बेभाव विक्री
शेतात टरबूज सडून खराब होण्याची भीती असल्याने टरबूज उत्पादक शेतकरी बेभाव विक्री करीत चित्र पहावयास मिळत आहे. हा भाव शेतकऱ्यांना न परवडणारा आहे. तरीपण शेतकरी विक्री करीत असल्याचे चित्र आहे.
---------------------------
गावागावात फिरून टरबुजाची विक्री
कोरोनाचा पार्श्वभूमीवर बाजारपेठ बंद असल्याने टरबुजाची बेभाव विक्री न करता काही शेतकरी गावागावात फिरून टरबुजाची विक्री करीत आहेत. या माध्यमातून चांगला नफा मिळत असल्याचे दिग्रस बु. येथील युवा शेतकरी सत्यपाल सिरसाट यांनी सांगितले.