मधुमेह, हृदयविकार रुग्णांसाठी ‘कोरोना’ ठरतोय जीवघेणा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 10:17 AM2020-06-08T10:17:28+5:302020-06-08T10:17:36+5:30

बहुतांश रुग्णांना मधुमेह, हृदयविकारासह उच्च रक्तदाब आणि इतर आजारांची समस्या होती.

'Corona' is fatal for diabetics and heart patients! | मधुमेह, हृदयविकार रुग्णांसाठी ‘कोरोना’ ठरतोय जीवघेणा!

मधुमेह, हृदयविकार रुग्णांसाठी ‘कोरोना’ ठरतोय जीवघेणा!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून, दोन महिन्यात कोरोना बाधितांचा आकडा ७९५ वर पोहोचला आहे, तर ३७ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश रुग्णांना मधुमेह, हृदयविकारासह उच्च रक्तदाब आणि इतर आजारांची समस्या होती. अशा परिस्थितीत नागरिकांनी वयोवृद्धांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
जिल्ह्याचा रेड झोनमध्ये प्रवेश झाल्यानंतर कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. शिवाय, मृत्यूदरही वाढला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी १४ एप्रिल रोजी गेला होता. तत्पूर्वी ११ एप्रिल रोजी ३१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाने सर्वोपचार रुग्णालयात आत्महत्या केली होती. ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे केवळ चार बळी गेले होते; मात्र मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी कोरोनाने आणखी एक बळी घेतला. मृत्यूचे हे सत्र मे महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुरूच राहिले. धक्कादायक बाब म्हणजे मे महिन्यात दर दिवसाआड एकाचा बळी गेला आहे. तर जूनच्या पहिल्याच आठवड्यात पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण लक्षणीय आहे; परंतु मृतकांमध्ये इतरही आजारांच्या समस्या असल्याचे आतापर्यंतच्या अहवालातून स्पष्ट होत आहे. गत दोन महिन्यांच्या कालावधीत ३७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यातील २१ रुग्ण हे ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते. ही चिंतेची बाब असून, वयोवृद्धांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

मृतकांना होते हे आजार
कोरोनामुळे मृत्यू झालेले रुग्ण हे ४० ते ८० वयोगटातील आहेत. यातील बहुतांश रुग्णांना उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह यासह निमोनिया आदी आजारांच्या समस्या होत्या. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी असल्याने कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.


सर्वच वयोगटातील व्यक्तींना कोरोनाची लागण झालेली आहे. मृतकांमध्ये ५० पेक्षा जास्त वयोगटातील रुग्णांची संख्या जास्त असून, त्यांना इतरही आजारांच्या समस्या होत्या. त्यामुळे नागरिकांनी कुटुंबातील वयोवृद्ध सदस्यांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला

 

Web Title: 'Corona' is fatal for diabetics and heart patients!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.