कोरोनाचा धसका : शहरे वगळून ग्रामीण भागात शाळा सुरूच राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 02:39 PM2020-03-15T14:39:34+5:302020-03-15T14:39:39+5:30
ग्रामीण भागातील शाळा सुरूच राहणार आहेत, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी सांगितले.
अकोला : कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्यामुळे राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश आरोग्य विभागाने दिला. त्यानुसार तालुका स्तरापर्यंतच्या शहरातीलच शाळा बंद ठेवल्या जातील, असे निर्देश राज्याच्या शिक्षण विभागाने दिले. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळा सुरूच राहणार आहेत, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी सांगितले. शहरांमध्ये असलेल्या जिल्हा परिषद शाळा सुरू ठेवण्याबाबत संभ्रम आहे. त्यावर उद्या रविवारपर्यंत स्पष्टीकरण येण्याची शक्यता आहे.
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने शनिवारी घेतला. तसे पत्र आरोग्य विभागाने शालेय शिक्षण विभागाला दिले. त्यामध्ये महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या क्षेत्रातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले. त्या पत्रात ग्रामीण भागाचा उल्लेख नाही. जिल्हा परिषदेच्या शाळा मुख्यत्वे ग्रामीण भागातच आहेत. त्याबाबत पत्रात उल्लेख नसल्याने शाळा सुरूच राहतील, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी ठग यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या अकोला, अकोट, मूर्तिजापूर, बाळापूर या शहरांतही शाळा आहेत. त्या शाळा सुरू ठेवाव्या की बंद, याबाबत शिक्षण विभाग संभ्रमात आहे. उद्या रविवारपर्यंत त्याबाबत स्पष्टीकरण येईल, असेही ठग यांनी सांगितले. याशिवाय, शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा, राजकीय सर्व कार्यक्रमांची परवानगी रद्द करण्यात आल्या आहेत; मात्र यादरम्यान दहावीची परीक्षा सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे आणि नागपूर या सहा ठिकाणचे जिम, स्विमिंग पूल, सिनेमा थिएटर ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे.