कोरोनामुक्त रुग्णाला झाली नाही पुन्हा बाधा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 10:16 AM2020-08-24T10:16:33+5:302020-08-24T10:16:42+5:30
गत पाच महिन्यात बरा होऊन गेलेल्या एकाही रुग्णाला पुन्हा कोरोना झाल्याचे आढळले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अॅन्टीबॉडिज मोठ्या प्रमाणात तयार होतात. त्यामुळे अशा रुग्णाला पुन्हा कोरोना होण्याची शक्यता कमी असते. गत पाच महिन्यात असा एकही रुग्ण पुन्हा कोरोनाची लागण झाली म्हणून रुग्णालयात दाखल झालेला नाही.
कोरोनावर प्रभावी औषध नाही; मात्र उपचाराच्या दहा दिवसांमध्ये वैद्यकीय निगराणीत असताना रुग्णाची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी डॉक्टरांकडून आवश्यक ते प्रयत्न केले जातात. त्यासाठी रुग्णाच्या जेवणात प्रामुख्याने कडधान्य असलेली भाजी, वरण-भात, पोळी, शेंगदाण्याचा लाडू, अंडे, ड्रायफ्रुट्स, फळं आदींचा समावेश केला जातो. या काळात रुग्णाच्या शरीरात कोरोना विरुद्ध लढणाऱ्या अॅन्टीबॉडिज मोठ्या प्रमाणात वाढतात. या अॅन्टीबॉडिज रुग्णाच्या शरीरात जास्त काळ टिकून राहत असल्याने रुग्णाना पुन्हा कोरोना होण्याचा धोका नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. गत पाच महिन्यात बरा होऊन गेलेल्या रुग्णाला कोरोनाची पुन्हा लागण झाल्याचा एकही प्रकार जिल्ह्यात घडला नाही, हे विशेष.
दहा दिवसांच्या उपचारामध्ये कोविड रुग्णाची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यावर भर दिला जातो. त्यामुळे दहा दिवसांच्या उपचारानंतर रुग्णांमध्ये अॅन्टीबॉडिजही तयार होतात. त्यामुळे रुग्णाला पुन्हा कोरोना होण्याचा धोका कमी असतो. गत पाच महिन्यात बरा होऊन गेलेल्या एकाही रुग्णाला पुन्हा कोरोना झाल्याचे आढळले नाही.
- डॉ. राजकुमार चव्हाण,
जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.