कोरोना : जिल्ह्यात मृत्यूच्या आकड्यात गौडबंगाल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:18 AM2021-04-15T04:18:40+5:302021-04-15T04:18:40+5:30
जिल्हा प्रशासनाकडून दररोज जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झाल्याची आकडेवारी दिली जाते. त्यानुसार बुधवारी दिवसभरात चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती देण्यात ...
जिल्हा प्रशासनाकडून दररोज जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झाल्याची आकडेवारी दिली जाते. त्यानुसार बुधवारी दिवसभरात चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली; परंतु दुपारपर्यंत स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या १४ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती समोर आली. प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीत आणि स्मशानभूमीतून मिळालेल्या मृतांच्या आकडेवारीत माेठी तफावत आढळली. या प्रकरणाची ‘लोकमत’ने शहानिशा केली असता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांनी, बुधवारी दिवसभरात १२ कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. यापैकी पाच रुग्ण हे जिल्ह्याबाहेरील, तर सात रुग्ण जिल्ह्यातील असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे देण्यात आली, तसेच एक रुग्ण खासगी रुग्णालयातील असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातून मिळाली. जिल्हा प्रशासनाकडून मिळणारी माहिती आणि प्रत्यक्षात स्मशानभूमीत होणारे अंत्यविधी या संख्येत तफावत आढळल्याने उर्वरित मृत्यूच्या नोंदीसह अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
काय म्हणतात आकडे !
जिल्हा प्रशासन- ४
‘जीएमसी’ प्रशासन- १२
रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही!
जिल्ह्यातील अनेक नॉनकोविड रुग्णालयांत केवळ सीटी स्कॅन अहवालाच्या आधारे कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या ठिकाणी मृत्यू हाेणाऱ्या काेविड रुग्णांची नोंद होत नसल्याचेही समोर आले आहे.
काय म्हणतात अधिकारी?
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून दिवसभरात दोन टप्प्यांत आकडेवारी प्राप्त होते. त्याच माहितीची नोंद जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयामार्फत घेतली जाते.
- डॉ. मिलिंद दुसाने, जिल्हा माहिती अधिकारी, अकोला
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून दुपारी ४ वाजेपर्यंतच्या मृत्यूची नोंद जिल्हा प्रशासनाकडे पाठविली जाते. त्यानंतर होणाऱ्या मृत्यूची नोंद दुसऱ्या दिवशी सकाळच्या अहवालात दिली जाते. यामध्ये केवळ जिल्ह्यातील रुग्णांचाच समावेश केला जातो. जिल्ह्याबाहेरील रुग्णाची माहिती संंबंधित जिल्हा प्रशासनाला दिली जाते. - डॉ. मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, जीएमसी, अकोला.