परिचारिका, कनिष्ठ निवासी डॉक्टरांना कोरोनाचा फटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 07:26 PM2020-10-18T19:26:27+5:302020-10-18T19:26:34+5:30
Akola GMC, CoronaViurs परिचारिकांसह कनिष्ठ निवासी आणि आंतरवासीता डॉक्टरांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
अकोला : गत सहा महिन्यांपासून कोरोना रुग्णवाढीचा बहुतांश ताण सर्वोपचार रुग्णालयावर आहे. येथील रुग्णसेवेची संपूर्ण जबाबदारी वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ निवासी डॉक्टर अन् आंतरवासीता डॉक्टरांच्या खांद्यावर असून, ते सलग सहा महिन्यांपासून कोविड वाॅर्डात कार्यरत आहेत. त्यामुळेच प्राध्यापक वर्गाच्या तुलनेत याच घटकाला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बाधितांमध्ये इतर सर्वसामान्यांसोबतच वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. प्रामुख्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाचा विचार केल्यास आतापर्यंत येथील ९३ वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये बहुतांश संख्या परिचारिकांची आहे. त्यापाठोपाठ कनिष्ठ निवासी डॉक्टर आणि आंतरवासीता डॉक्टरांची संख्या जास्त आहे. आरोग्य विभागातील हाच घटक थेट रुग्णांच्या संपर्कात असल्याने साहजिकच त्यांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसणार आहे. मात्र, दुसरीकडे मोजकेच प्राध्यापक कोविड वाॅर्डात रुग्णसेवा देतात. त्यामुळेच परिचारिकांसह कनिष्ठ निवासी आणि आंतरवासीता डॉक्टरांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.