कोरोनाची धास्ती; रॅपिड टेस्टसाठी अनेकांची टाळाटाळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 10:39 AM2020-07-19T10:39:02+5:302020-07-19T10:39:20+5:30
अजूनही अनेकांमध्ये कोरोनाची धास्ती असल्याने लोक तपासणीसाठी टाळाटाळ करीत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जिल्ह्यात विशेषत: ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने तपासण्यांची गती वाढविण्यासाठी रॅपिड अॅन्टीजन टेस्टचा आधार घेतला आहे; परंतु अजूनही अनेकांमध्ये कोरोनाची धास्ती असल्याने लोक तपासणीसाठी टाळाटाळ करीत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
कोरोना संसर्गाची भीती अनेकांमध्ये असली, तरी लोक त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत; मात्र तपासणीची वेळ आली की, लोकांच्या मनातील कोरोनाची भीती दिसून येत आहे. असाच काहीसा प्रकार सध्या ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. आशांच्या माध्यमातून ग्रामीण भागात सर्वेक्षणानंतर लक्षणं आढळलेल्या लोकांची रॅपिड अॅन्टीजन टेस्ट केली जात आहे; मात्र बहुतांश लोक भीतीपोटी कोरोनाची चाचणी करण्यास टाळत असल्याचे वास्तव आहे. अशा परिस्थितीत जास्तीत जास्त लोकांच्या चाचण्या करण्याचे मोठे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर आहे.
साखळी तुटेल,तरच कोरोना हरेल!
नागरिकांनी कोरोनाविषयीची भीती बाळगण्याऐवजी त्या विरोधात लढण्यासाठी स्वत:हून तपासणीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. रॅपिड अॅन्टीजन टेस्टद्वारे कोरोनाचे काही मीनिटामध्येच निदान होते. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू करून कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडणे सहज शक्य होईल. त्यामुळे नागरिकांनी मनात भीती न बाळगता कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले.
ग्रामीण भागातील काही ठिकाणी कोरोनाच्या चाचणीसाठी काही लोकांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले; परंतु कोरोनाला घाबरुन चालणार नाही. कोरोनाच्या संसर्गाची चेन तोडायची असेल, तर लक्षणे असणाऱ्या प्रत्येकाने कोेरोनाची चाचणी करून घ्यावी.
- डॉ. राजकुमार चव्हाण,
जिल्हा शल्य चिकित्सक , अकोला.