उमई येथे कोरोना तपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:19 AM2021-04-23T04:19:48+5:302021-04-23T04:19:48+5:30
फोटो: मेल फोटोत मजुरांना शासनाने मदत द्यावी तेल्हारा : बाळापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील मजुरांवर कोरोना संचारबंदीमुळे उपासमारीची वेळ आली ...
फोटो: मेल फोटोत
मजुरांना शासनाने मदत द्यावी
तेल्हारा : बाळापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील मजुरांवर कोरोना संचारबंदीमुळे उपासमारीची वेळ आली आहे. गरजू व भूमिहीन मजुरांना शासनाने आर्थिक मदत किंवा पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी परिसरातील मजुरांनी केली आहे.
पाण्याअभावी माकडांची गावांकडे धाव
वाडेगाव : पाण्याअभावी माकडे गावांमध्ये धाव घेत आहेत. वाडेगावसह दिग्रस, तुलंगा, सस्ती आदी गावांमध्ये माकडांनी धुमाकूळ घातला असून, माकडे नागरिकांच्या घरांमध्ये शिरत आहेत. घरांच्या छतावर चढून नुकसान करीत आहेत. त्यामुळे माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
दहीहांडा गावात संचारबंदीला प्रतिसाद
दहीहांडा : दहीहांडा गावात २१ एप्रिलपासून बाजारपेठ ११ वाजल्यानंतर बंद होत असल्याने, सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. गावातील नागरिक व व्यापाऱ्यांनी संचारबंदीला प्रतिसाद दिला आहे. कोरोनामुळे गावातील मेडिकल व दवाखाने वगळता इतर सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात येत आहेत.
कवठा येथे कोरोना तपासणी शिबिर
कवठा बु. : सावरा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या कवठा बु. येथे नुकतेच कोरोना तपासणी शिबिर पार पडले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश वालसिंगे, सीएचओ कुलट यांनी शिबिरात तपासणी केली. या वेळी सरपंच देवानंद रावणकार, ग्रामपंचायत सदस्य बंडू धांडे, राजेश सावीकर, प्रमोद धांडे, मुख्याध्यापिका लता डामरे, शिवा रावणकार, माधुरी धांडे उपस्थित होते.
दहीगाव येथील भवानीदेवी यात्रा रद्द
तेल्हारा : दहीगाव येथील हिंगळा भवानी मातेचा दरवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंतीला होणारा यात्रा महोत्सव यंदा कोरोना प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आला आहे. मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. भाविकांनी दर्शनासाठी येथे येऊ नये, असे मंदिर व्यवस्थापनाने कळविले.
अतिरिक्त पोलीस अधीक्षकांची बाळापूरला भेट
बाळापूर : बाळापूर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सण, उत्सव आणि कोरोनाचा आढावा घेण्याच्या दृष्टिकोनातून अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांनी बुधवारी बाळापूर शहराला भेट देऊन पाहणी केली.
हिवरखेड आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात
हिवरखेड : येथील आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात सापडले असून, येथील अनेक पदे रिक्त आहेत. रुग्णवाहिका नाही. निवासी डॉक्टर नाही. त्यामुळे रुग्णांची कुचंबणा होत आहे. आरोग्य विभागाने या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
युवतीवर अत्याचार, युवकास अटक
पातूर : येथील २३ वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण करणारा आरोपी अनिल उर्फ गोलू सुभाष तायडे (२४, रा. सिदाजी वेटाळ, पातूर) याला पातूर पोलिसांनी २० एप्रिल रोजी अटक केली. युवतीच्या तक्रारीनुसार आरोपीविरुद्ध पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.
विहिरीत पडलेल्या वासराला जीवनदान
बोर्डी : येथून जवळच असलेल्या वसाली नागापूर शिवारात दौलत रजाने यांचे वासरू विहिरीत पडले. येथील युवक बाळकृष्ण सहारे याने विहिरीत उतरून वासराला बाहेर काढून जीवनदान दिले. त्याला हिंमत रजाने, श्रीकृष्ण नेवारे, अमर घनबहादूर आदींनी सहकार्य केले.
चोहोट्टा बाजारात खरेदीसाठी झुंबड
चोहोट्टा बाजार : शासनाने संचारबंदी लागू केली असून, अत्यावश्यक खरेदीसाठी सकाळी ७ ते ११ ही वेळ दिली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावांमधील लोक खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. बाजारपेठेत एकच झुंबड होत असल्याने कोरोना नियम पायदळी तुडविले आहेत. याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे.
ढगाळ वातावरणाने कांदा, मूग संकटात
खानापूर : परिसरात शेतकऱ्यांनी यंदा उन्हाळी मूग, कांदा पिकाची लागवड केली आहे. परंतु ढगाळ वातावरणामुळे पिके संकटात सापडली आहेत. ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंताग्रस्त असून, अवकाळी पाऊस, गारपिटीच्या शक्यतेमुळे पिकाची नासाडी होण्याची शक्यता आहे.
कट्यार येथे रेतीची अवैध वाहतूक
म्हैसांग : परिसरातील कट्यार, वडद, कपिलेश्वर येथील पूर्णा नदी पात्रातून दररोज हजारो ब्रास रेतीची चोरी होत असून, ट्रॅक्टरद्वारे रेतीची अवैध वाहतूक करण्यात येत आहे. याकडे तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे. रेतीचोरीला आळा घालण्याची मागणी होत आहे.