महापालिकेच्या जलप्रदाय विभागातील कर्मचाऱ्याचा कोरोनाने घेतला बळी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 12:13 PM2020-06-15T12:13:13+5:302020-06-15T12:13:40+5:30
जलप्रदाय विभागातील एका चतुर्थ कर्मचाºयाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बाब अहवालाद्वारे रविवारी समोर आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोनाच्या संकट काळातही उत्तर झोनमधील नायगाव परिसरात पाणीपुरवठा करणाºया जलप्रदाय विभागातील एका चतुर्थ कर्मचाºयाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बाब अहवालाद्वारे रविवारी समोर आली. दरम्यान, या घटनेमुळे मनपा कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाच्या आर्थिक मदतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केंद्र व राज्य शासनाने कोरोना विषाणूची साखळी खंडित करण्यासाठी २३ मार्चपासून टाळेबंदी लागू केली. त्यापूर्वी १५ मार्चपासून मनपा प्रशासनाने शहरात बाहेरगावातून दाखल होणाºया नागरिकांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण मोहीम सुरू केली होती. अर्थात कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेची संपूर्ण यंत्रणा १५ मार्चपासून सतत कामाला लागली आहे. सद्यस्थितीमध्ये महापालिका क्षेत्रात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून, कोरोनाबाधित रुग्णांनी १००० चा टप्पा ओलांडला आहे. ही बाब महापालिका, जिल्हा सामान्य रुग्णालय, पोलीस तसेच जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर घालणारी आहे. यादरम्यान, कोरोनाच्या संकट काळात महापालिकेची संपूर्ण यंत्रणा एकदिलाने मुकाबला करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अशा स्थितीमध्ये मनपाच्या जलप्रदाय विभागात कार्यरत एका चतुर्थ श्रेणी कर्मचाºयामध्ये कोरोना विषाणूची लक्षणे आढळून आल्याने त्यांना १० जून रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. संबंधित कर्मचाºयाला उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यामुळे त्याचा रविवारी मृत्यू झाला. संबंधित कर्मचाºयाचा मृत्यू झाल्याची वार्ता मनपा वर्तुळात वाºयासारखी पसरताच कर्मचाºयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पंधरा लाख रुपयांची मदत मिळेल का?
कोरोना विषाणूचा मुकाबला करताना मनपा कर्मचाºयाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय सत्ताधारी भाजप व मनपा प्रशासनाने संयुक्तरीत्या घेतला होता. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाºयाच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. सत्ताधारी व प्रशासनाने केलेला आर्थिक मदतीचा दावा लक्षात घेता प्रत्यक्षात १५ लाखांची मदत मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मार्च महिन्यापासून महापालिकेचे सर्व कर्मचारी कोरोना विषाणूचा अविरत मुकाबला करीत असल्याने कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय तणावात आहेत. कर्मचाºयांच्या मानसिक तणावात वाढ होत चालली आहे. यावर प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा.
-विठ्ठल देवकते
अध्यक्ष, म्युनिसिपल मजदूर युनियन