अकोला जिल्ह्यातील कोरोनाला ७८१ गावांनी वेशीवरच रोखले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 11:02 AM2020-08-14T11:02:04+5:302020-08-14T11:02:17+5:30

जिल्ह्यातील ७८१ गावांनी कोरोनाला आपल्या वेशीवरच रोखल्याचे समोर आले आहे.

Corona not enterd in 781 villages of Akola district | अकोला जिल्ह्यातील कोरोनाला ७८१ गावांनी वेशीवरच रोखले!

अकोला जिल्ह्यातील कोरोनाला ७८१ गावांनी वेशीवरच रोखले!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा घट्ट होत असून, गुरुवारी आणखी २१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. हे सर्वच रुग्ण ग्रामीण भागातील असून, २१ पैकी २० रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. एकीकडे असे चित्र असले तरी जिल्ह्यातील ७८१ गावांनी कोरोनाला आपल्या वेशीवरच रोखल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यात अकोला शहरातून कोरोनाचा शिरकाव झाला. सात एप्रिल रोजी बैदपुरा येथील पहिला रुग्ण आढल्यानंतर कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली. त्यानंतर अकोला शहर हे कोरोनाचा हॉटस्पॉट झाले. विदर्भात सर्वाधिक रुग्ण व सर्वाधिक मृत्यू, अशी अकोल्याची जुलैच्या मध्यापर्यंत स्थिती होती; मात्र त्याही परिस्थितीत ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा शिरकाव फारसा झाला नव्हता. जुलैच्या मध्यानंतर मात्र ग्रामीण भागात कोरोनाचा झपाट्याने विळखा बसत आहे. सर्वात आधी पातूर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर बाळापूर, अकोट, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा अशा तालुक्यांमध्ये विळखा घट्ट होत गेला.
या पृष्ठभूमीवरही ७८१ गावांंनी कोरोनाची बाधा होण्यापासून गावाला वाचविले आहे. त्यामागे ग्रामपंचायतचा पुढाकार, ग्रामस्थांचे सहकार्य, कोरोना प्रतिबंधक नियमांचे कटाक्षाने पालन व आजार न लपविता आरोग्य विभागाचा सल्ला घेऊन केलेले उपचार याचा मोठा वाटा असल्याचे समोर आले आहे.
‘गाव करी ते राव न करी’ असे म्हटले जाते; परंतु कोरोनाच्या लढाईत प्रत्येक व्यक्ती महत्त्वाचा असल्याने ग्रामस्थांच्या सहकार्याशिवाय ही लढाई जिंकता आली नसती, हेही तितकेच खरे. अनेक गावांत गावपातळीवर सीमाबंदी करण्यात आली होती; परंतु याचा फायदा झाला. कामानिमित्ताने ग्रामीण भागातून शहरात नागरिकांना जाणे आवश्यक होते. बाहेर जाताना पोलिसांच्या धाकाने तोंडावर रुमाल अथवा मास्क लावून जाणे बंधनकारक असल्याने तो नियम पाळल्या गेला. बहुतेक गावात सॅनिटायझर व मास्कचा वापर करण्यात आला.
काही गावांमध्ये बांधावर खते व बियाणे या योजनेचा फायदा झाला; मात्र त्यापासून अनेक गावे वंचितच राहिले होते.
या गावातील ग्रामस्थांनी बियाणे व रासायनिक खतांकरिता शेतकरी कृषी केंद्रावर जाऊन दुसरे काही खरेदी न करता स्वत:ची काळजी घेत सरळ घरी परतण्याची दक्षता घेतल्याने संसर्ग टाळता आला.


कोरोनामुक्त गावे
जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात ७४, अकोला १५0, मूर्तिजापूर १२८, बार्शीटाकळी ११२, पातूर ८९, तेल्हारा 0६ व अकोट तालुक्यात १२२ गावे कोरोनामुक्त राहिली आहे. या ग्रामस्थांनी आतापर्यंत घेतलेली काळजी पुढेही कायम ठेवली तर कोरोना वेशीवरच थांबेल.


प्रवाशांची नोंद अन् प्राथमिक तपासणी
बाहेरगावाहून तालुक्यात येणाऱ्यांची माहिती ठेवून. त्यांची तपासणी करण्याचे काम प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांनी केले. कोरोनासदृश लक्षणांबाबत प्राथमिक माहिती देत ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली. तसेच साथीचे आजार पसरणार नाहीत, याची दक्षता घेतली.


अंगणवाडी ताई, आशा कोरोना योद्धा!
अंगणवाडी ताई, आशा वर्कर्स या पहिल्या फळीतील कोरोना योद्धा ठरल्या. प्रत्येक घरी जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांनी कोरोनाबाबत माहिती दिली. कोणी आजारी आहे का, याची नोंद घेतली. आरोग्य तपासणीसाठी ग्रामस्थांना प्रोत्साहित केले. कोरोनाची भीती न बाळगता त्या कार्यरत राहिल्या.

Web Title: Corona not enterd in 781 villages of Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.