अकोल्यात कोरोनाचा प्रकोप; एकाच दिवशी २० ‘पॉझिटिव्ह’
By रवी दामोदर | Published: April 4, 2023 04:57 PM2023-04-04T16:57:22+5:302023-04-04T16:57:48+5:30
कोरोना संसर्ग तपासणीचे ६४ अहवाल प्राप्त झाले असून, त्यामध्ये २० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
अकोला: गत आठ दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढत चालला आहे. मंगळवारी एकाच दिवशी तब्बल २० पॉझिटिव्ह आढळून आल्याने अकोलेकरांचे टेन्शन वाढले आहे. ऐन लग्नसराई, सणासुदीच्या काळात कोरोना पसरत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे शहराच्या ठिकाणी फैलाव होत असलेल्या कोरोनाने आता ग्रामीण भागात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. २० पॉझिटिव्ह रुग्णांपैकी १६ रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत.
कोरोना संसर्ग तपासणीचे ६४ अहवाल प्राप्त झाले असून, त्यामध्ये २० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामध्ये १२ पूरूष तर ८ महिलांचा समावेश आहे. वातावरणात होत असलेल्या बदलाचा फटका आरोग्याला बसू लागला आहे. घरोघरी सर्दी, खोकला अन् तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, व्हायरलसोबतच कोविडचेही रुग्ण आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे. एकाच दिवसात कोविडचे २० रुग्ण आढळून आले आहे. कोविडचा संभाव्य धोका लक्षात घेता वेळीच संदिग्ध रुग्णांच्या कोविड चाचण्या करण्याची गरज आहे. मात्र, तसे होताना दिसून येत नाही.
असे आढळले रुग्ण
मंगळवारी २० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून, त्यामध्ये ग्रामीण भागातील रुग्ण वाढले आहेत. त्यात बाळापूर येथील दोन, मुर्तिजापूर येथील ११, अकोला ग्रामीण येथील तीन व अकोला महानगपालिका क्षेत्रातील चार रहिवाशी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
५ कोरोनामुक्त, सक्रिय रुग्ण ३८ वर
कोरोनावर मात केलेल्या पाच रुग्णास मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्यस्थितीत जिल्ह्यात ३८ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील सहा रुग्ण रुग्णालयात दाखल असून, उर्वरीत ३२ जणांवर होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.