ग्रामीण भागातही कोरोना रुग्ण ‘होम क्वारंटीन’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 10:32 AM2020-08-31T10:32:39+5:302020-08-31T10:32:48+5:30
शहरात आतापर्यंत १७, तर ग्रामीण भागात १५ पेक्षा जास्त रुग्णांनी होम क्वारंटीन हा पर्याय निवडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोनाची सौम्य लक्षणे किंवा लक्षणेच नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना जिल्हा प्रशासनाने होम क्वारंटीनची मुभा दिली होती. या सुविधेचा लाभ घेत शहरात आतापर्यंत १७, तर ग्रामीण भागात १५ पेक्षा जास्त रुग्णांनी होम क्वारंटीन हा पर्याय निवडला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने खाटांची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी व्हावा, या अनुषंगाने कोरोनाची सौम्य लक्षणे किंवा लक्षणेच नाहीत, अशा पॉझिटिव्ह रुग्णांना होम क्वारंटीनची मुभा जिल्हा प्रशासनाने दिली होती; परंतु सुरुवातीला शहरी भागातच या सुविधेचा लाभ रुग्णांनी घेण्यास सुरुवात केली होती; मात्र आता ग्रामीण भागातही रुग्ण होम क्वारंटीनचा पर्याय निवडत आहेत. ग्रामीण भागात हा पर्याय निवडताना जिकिरीचे असून, नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. होम क्वारंटीन होताना रुग्णांनी नियमांचे पालन न केल्यास कोरोनाचा फैलाव अधिक वेगाने होऊ शकतो.
ज्या रुग्णांनी होम क्वारंटीनची मागणी केली आहे, अशा रुग्णांच्या घराची पाहणी केली जाते. रुग्ण सर्वच निकष पार पाडत असेल, तरच त्याला होम क्वारंटीनची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
- डॉ. फारुख शेख,
वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा