लॉकडाऊनमध्येही वाढले कोरोनाचे रुग्ण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 10:02 AM2020-07-14T10:02:22+5:302020-07-14T10:02:35+5:30
अकोल्यातील अकोट येथे १० दिवसांचा, पातूर येथे चार तर बाळापुरात पाच दिवसांचा जनता कर्फ्यू लावला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : लॉकडाऊन केल्यामुळे कोरोनाची साखळी तुटेल, असा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असला तरी लॉकडाऊन हा प्राथमिक पातळीवरील उपाय होता. तो आता फारसा उपयुक्त होणार नाही, असे तथ्य समोर आले आहे. अकोल्यातील अकोट येथे १० दिवसांचा, पातूर येथे चार तर बाळापुरात पाच दिवसांचा जनता कर्फ्यू लावला होता. त्या काळातही येथे कोरोनाचा मोठा शिरकाव झाला असून, आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याचे वास्तव आहे.
अकोला शहराच्या तुलनेत जुलैच्या पहिल्या आठवड्यापासूनच कोरोनाने ग्रामीण भागाला लक्ष्य केले आहे. बारा दिवसांत जिल्ह्यात कोरोनाचे एकूण ३०८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. यामध्ये १२९ महापालिका कार्यक्षेत्रातील आहेत, तर उर्वरित २०२ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.
अकोट तालुक्यातील ३ ते ९ जुलैपर्यंत जनता कर्फ्यू होता. ३ जुलै रोजी तालुक्यातील या तालुक्यात २२ पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद होती जनता कर्फ्यूदरम्यान रुग्णांची संख्या वाढली. नऊ जुलै रोजी तालुक्यातील ६५ पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नोंदविण्यात आली होती. सद्यस्थितीत अकोट हे कोरोनाचा नवा हॉटस्पॉट झाला असून, १३ जुलै रोजी या तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ९४ झाली आहे. बोरगाव मंजू येथे ३० जून ते ०२ जूलै दरम्यान जनता कर्फ्यु होता या कफ्यूर्ला समिश्र प्रतिसाद मिळाला होता येथेही रूग्णसंख्या वाढली असून आता पंधरा पॉझिटिव्ह रूग्ण आहेत. बाळापुरातही लॉकडाऊनच्या काळात दहा रूग्ण वाढल्याचे समोर आले आहे.
ग्रामीण भागातील बहुतांश रुग्णांवर सर्वोपचार रुग्णालय आणि कृषी विद्यापीठातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य कें द्रांना आरोग्य दृष्टीने अधिक बळकट करणे गरजेचे आहे.
अनलॉकमध्ये अर्थकारण वाढले अन् रुग्णही!
एक दिवसाच्या जनता कर्फ्यूनंतर २४ मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे चाक रूतले. अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळता सर्व उद्योग व्यापार ठप्प झाला. कोरोना आता संपणार नाही, हे लक्षात आल्यावर पुरेशी काळजी घेऊन अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली. कोट्यवधीचे अर्थकारण हळूहळू सावरत वाढत आहे, सोबतच लोकांची गर्दीही वाढू लागल्याने संसर्गाचे प्रमाण वाढून कोरोनाचे रुग्णही वाढले आहेत. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, ती प्रत्येकाची जबाबदारी आहे.