मोबाइल, गाणी, गप्पांमध्ये संपतो कोरोना रुग्णांचा दिवस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 10:50 AM2020-09-04T10:50:04+5:302020-09-04T10:50:14+5:30
दिवसभर कोणी गाणी ऐकतात, गाणी म्हणतात, तर काही रुग्णांनी सोबत आणलेली पुस्तके त्यांची साथीदार झाली आहेत.
- योगेश चौधरी
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना पॉझिटिव्ह असलेले रुग्ण कोरोनालासुद्धा पॉझिटिव्ह घेऊन आपला विलगीकरणाचा काळ व्यतीत करत आहेत अन् या काळामध्ये त्यांच्या मदतीला मोबाइल, जुनी गाणी, चांगली पुस्तके व आपल्याच सोबत विलगीकरणात असलेल्या रुग्णांशी गप्पा गोष्टींची साथ मिळत असल्याचे चित्र आहे.
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सध्या अकोलेकरांची चिंता चांगलीच वाढली आहे. गुरुवारी तब्बल ९९ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले तर आजपर्यंतचे सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण अकोल्यात आहे. या पृष्ठभूमीवर लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे; मात्र पॉझिटिव्ह निघाल्यावर कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची दिनचर्या व तेथील व्यवस्था अशी भीती कमी करण्यासाठी खूपच मोलाची मदत करू शकते. अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कोविड सेंटरमध्ये सध्या १३३ रुग्ण आहेत. या प्रत्येक रुग्णांच्या खोलीमध्ये पाण्यासाठी स्वतंत्र कॅन ठेवण्यात आलेली आहे.
येथील बहुतांश रुग्णांना मोबाइल हा मोलाचा आधार वाटत आहे. आपल्या कुटुंबीयांसह, नातेवाइक व मित्रपरिवारासोबत कनेक्ट राहिल्याने या रुग्णांना मानसिक आधार मिळत आहे. सकाळी व संध्याकाळी काही रुग्ण योगा करताना दिसतात. संध्याकाळी सर्व रुग्ण कोविड सेंटरच्या गच्चीवर जाऊन पाय मोकळे करतात. दिवसभर कोणी गाणी ऐकतात, गाणी म्हणतात, तर काही रुग्णांनी सोबत आणलेली पुस्तके त्यांची साथीदार झाली आहेत. फारच कंटाळा आला तर बाजूच्या रुग्णांसोबत फिजिकल डिस्टन्सिंग ठेवत गप्पा मारून वेळ भरून काढली जात आहे. आयुष्यात पॉझिटिव्ह राहावे असा उपदेश ऐकतच आपल्या अनेक पिढ्या मोठ्या झाल्या; मात्र कोरोनामुळे पॉझिटिव्ह या शब्दाचीच भीती वाटू लागली आहे. अकोला तर कोरोनाचा हॉटस्पॉट. त्यामुळे एकदा का वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला की त्या रुग्णांच्या अन् त्यांच्या नातेवाइकांसह संपर्कात आलेल्यांच्या पायाखालची जमीनच सरकते; मात्र आता कोरोनाशी दोन हात करण्याची मानसकिता समाजाची तयार होत आहे.
अशी आहे दिनचर्या
कोरोना रुग्णांना सकाळी ७ वाजता चहा, नाश्ता मिळतो. आठ वाजता प्रत्येकाच्या शरीरातील आॅक्सिजनची मात्रा तपासली जाते. त्यानुसार संबंधित डॉक्टर पुढील सूचना देतात. दुपारी १२ वाजता जेवण मिळते. चार वाजता चहा, नाश्ता व संध्याकाळी ७ वाजता जेवण अशी दिनचर्या आहे.
स्वच्छता व व्यवस्थेवर समाधान
कोविड सेंटरमधील स्वच्छता व चहा-नाश्त्याच्या व्यवस्थेवर येथील रुग्णांचे समाधान असल्याचे या सेंटरमध्ये दाखल एका रुग्णाने ‘लोकमत’ ला सांगितले. काही लहान मुले पॉझिटिव्ह आहेत. त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्या सोबत त्यांची आई आहे, ज्येष्ठ नागरिकांची इतर रुग्णही काळजी घेत असल्याने कोणत्याही रुग्णाला एकटे वाटणार नाही, असे वातावरण असल्याची माहिती त्या रुग्णाने दिली.