अकोल्यात क्वारंटीन कक्षात रुग्णांचा झिंगाट डान्स; फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 10:19 AM2020-06-19T10:19:40+5:302020-06-19T12:05:33+5:30
विलगीकरण कक्षात दाखल रुग्णांनी गुरुवारी दुपारी झिंगाट गाण्यावर डान्स केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
अकोला : शहरात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीने अकराशेचा आकडा पार केला असून, दर दिवशी वाढत्या मृत्यू दराने जिल्हा हादरला असताना पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विलगीकरण कक्षात दाखल रुग्णांनी गुरुवारी दुपारी झिंगाट गाण्यावर डान्स केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामध्ये रुग्णांनी फिजिकल डिस्टन्स पाळले नसून, काहींच्या तोंडाला मास्कही नव्हते; मात्र अधिकारी त्यांची शुटिंग काढण्यात मग्न असल्याचे दिसून आले. रुग्णांच्या मनोरंजनाचा उद्देश चांगला असला तरी आरोग्य प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होणे चुकीचे असल्याचे पडसाद गुरुवारी समाजमाध्यमांमध्ये होते.
विलगीकरण कक्षाच्या बाहेरच झालेल्या डान्सवरून असे लक्षात येते की त्यातील काही रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून, त्यांना रुग्णवाहिका घेऊन जात आहे तर उर्वरित रुग्ण आनंदाच्या भरात नाचत आहेत; मात्र या ठिकाणी काही लहान मुलेसुद्धा दिसत असून, त्यांच्या तोंडाला मास्क नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे इतर रुग्णांपासून त्यांना संसर्ग होण्याचा धोका नाकारता येत नाही. याबाबत आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. महत्त्वाचे म्हणजे पीकेव्हीतील विलगीकरण कक्षाची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे ते उपविभागीय महसूल अधिकारी डॉ. नीलेश अपार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, मी गेले दोन दिवस रजेवर असल्याचे सांगून उद्या आल्यानंतर घडलेल्या घटनेची माहिती घेणार असल्याचे म्हटले.