मुर्तीजापूरात मृत व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; अंत्ययात्रेत शेकडो झाले होते सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 04:13 PM2020-05-17T16:13:29+5:302020-05-17T16:16:05+5:30
अहवाल १६ मे रोजी संध्याकाळी पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
मूर्तिजापूर : येथील पठाणपुरा भागात राहणाऱ्या एका रुग्णाला सुरुवातीला शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने १३ मे रोजी अकोला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याच दिवशी मृत्यू झाला. दरम्यान त्याचे 'स्वॅब' नमुने घेण्यात आले होते. त्याचा अहवाल १६ मे रोजी संध्याकाळी पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
आतापर्यंत तालुक्यात एकही बाधित रुग्ण नसल्याने कोरोना संबंधी हा तालुका 'सेफ' होता. मात्र, मुर्तिजापूरच्या कोरोनामुक्तीच्या लढ्याला प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेचा आणि हलगर्जीपणा भोवला आहे. १३ मे रोजी शहरातील एका संशयित रूग्णाचा अकोला जिल्हा सर्वोपचार रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या रूग्णाचे 'स्वॅब' तपासणीसाठी पाठवले होते. मात्र, हा रूग्ण दगावला असताना याचा अहवाल तातडीने बोलावून तो कसा येतो याची शहानिशा करुनच रूग्णालय प्रशासनाने वैद्यकीय अहवालात नंतरच मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करायला हवा होता. परंतु तसे न करता रुग्णालय प्रशासनाने मृतदेह नातेवाईकांना कसा सुपूर्द केला हाच संशोधनाचा विषय ठरला आहे. मृतक हा शहरातील राजकीय क्षेत्रातील व्यक्तीमत्व असल्याने त्याच्या अंत्ययात्रेत संचारबंदी असतांनाही मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. ५०० ते ७०० लोक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. या अंत्ययात्रेत अंत्यसंस्कारावेळी कोणतीही विशेष काळजीही घेतल्या गेली नव्हती. त्यामुळे रुग्ण असताना व मृतदेहाच्या संपर्कात येणाऱ्यांचा आकडा हजाराच्यावर आहे. संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेणे आता मोठी डोकेदुखी ठरली असली तरी अनेकांना कॉरंटीन करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यात पोलीस, नगर परिषद, प्रशासनातील अधिकारी, नगरसेवक व कर्मचाºयांचा समावेश आहे. १६ मे रोजी पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले. पोलीस उपविभागीय अधिकारी, डॉ. अर्जुन भोसले, उपविभागीय अधिकारी अभयसींह मोहिते, तहसीलदार प्रदीप पवार, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र नेमाडे यांच्या सह संबंधित विभागाचे कार्यकारी कामाला लागले आहेत.(शहर प्रतिनिधी)