कोरोना : पहिल्या नऊ दिवसांतच रेमडेसिविर ठरू शकते उपयुक्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:19 AM2021-05-08T04:19:02+5:302021-05-08T04:19:02+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांची संख्या वाढत असून, बहुतांश रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. अशा रुग्णांवर रेमडेसिविर इंजेक्शन प्रभावी ठरत असून, ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांची संख्या वाढत असून, बहुतांश रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. अशा रुग्णांवर रेमडेसिविर इंजेक्शन प्रभावी ठरत असून, अनेक रुग्णांचे प्राणदेखील वाचले आहेत. त्यामुळे कोविड पाॅझिटिव्ह रुग्णाचा सिटी स्कॅन स्कोअर जास्त आल्यास रुग्णांच्या नातेवाइकांकडून रेमडेसिविर देण्याचा हट्ट केला जात आहे. शिवाय, काही खासगी डॉक्टरांकडूनही रुग्णांच्या नातेवाइकांना रेमडेसिविरचा सल्ला दिला जात आहे. मात्र, तत्ज्ञांच्या मते प्रत्येकालाच रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता नाही. या इंजेक्शनचा ठराविक कालावधीत उपयोग झाला तरच ते कोविडच्या रुग्णांसाठी संजीवनी ठरू शकते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांकडून केला जाणारा रेमडेसिविरचा हट्ट हा चुकीचा आहे. रेमडेसिविरची गरज नसेल, तर इतरही ॲन्टीव्हायरल औषधं कोरोनावर प्रभावी ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांनीही गरज असेल तेव्हाच रेमडेसिविरचा उपयोग करावा, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिला जात आहे.
रेमडेसिविर केव्हा उपयुक्त
रुग्ण आजारी पडल्याच्या तिसऱ्या दिवसापासून ते ९ व्या दिवसापर्यंत रेमडेसिविर कोविडच्या गंभीर रुग्णांवर उपयुक्त ठरते.
आजारी पडल्याच्या नऊ दिवसांनंतर रेमडेसिविरचा उपयोग व्यर्थ ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
शासकीय रुग्णालयात अशा रुग्णांवर रेमडेसिविरचा वापर न करता इतर औषधांचा उपयोग केला जातो. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचेही प्रमाण अधिक आहे.
आजारी पडल्यापासून तिसऱ्या दिवसापासून, तर ९ व्या दिवसांपासून दिले तरच उपयुक्त. त्यामुळे गरज असेल तरच डॉक्टरांनी रुग्णांना रेमडेसिविर द्यावे. सिटी स्कोअर ५ किंवा त्यापेक्षा कमी असेल तर रेमडेसिविर न देता इतर औषधांचा वापर करावा.
-डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला.