कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला; ‘जीएमसी’तील कोविड वार्डच्या संख्येतही घट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2020 10:09 AM2020-11-01T10:09:59+5:302020-11-01T10:13:01+5:30
Akola coronavirus News शासकीय वैद्यकीय रुग्णालय प्रशासनातर्फे कोविड वार्ड वाढविण्यात आले होते.
अकोला: गत महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्यावाढीचा वेग मंदावला आहे. शिवाय, ॲक्टिव्ह रुग्णांचीही संख्या कमी झाल्याने सर्वोपचार रुग्णालयातील १५ पैकी चार कोविड वार्ड बंद करण्यात आले आहेत. कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना संपूर्ण ताण सर्वोपचार रुग्णालयावर आला होता. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता शासकीय वैद्यकीय रुग्णालय प्रशासनातर्फे कोविड वार्ड वाढविण्यात आले होते. सुरुवातीला केवळ चार वार्ड राखीव ठेवण्यात आले होते; मात्र रुग्णसंख्यावाढ झाल्याने येथील कोविड वार्डची संख्या १५ पर्यंत वाढविण्यात आली होती. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच रुग्णसंख्यावाढीचा वेग कमी झाला, तर दुसरीकडे बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाल्याने खाटाही रिकाम्या होऊ लागल्या. सद्यस्थितीत सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या कोविड रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनातर्फे कोविड वार्ड कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नॉनकोविड रुग्णसंख्येतही वाढ
कोरोनाकाळात सर्वोपचार रुग्णालयात नॉनकोविड रुग्णांमध्ये लक्षणीय घट झाली होती; मात्र जिल्ह्यात व्हायरल फिवरच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने सर्वोपचार रुग्णालयात आता हळूहळू नॉनकोविड रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.
कंत्राटी मनुष्यबळही केले कमी
सर्वोपचार रुग्णालयातील खाटांची संख्या कमी कमी करण्यात आली. यापूर्वी कोविडच्या पार्श्वभूमीवर भरण्यात आलेले कंत्राटी पददेखील रिक्त करण्यात आले आहेत.