कोरोना पसरला; अर्धे शहर ‘कंटेनमेन्ट झोन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 09:22 AM2020-05-20T09:22:41+5:302020-05-20T09:22:49+5:30

आज रोजी शहरातील ५१ भागात कंटेनमेन्ट झोन तयार करण्यात आले आहेत.

Corona spread; Half city 'containment zone' | कोरोना पसरला; अर्धे शहर ‘कंटेनमेन्ट झोन’

कोरोना पसरला; अर्धे शहर ‘कंटेनमेन्ट झोन’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शहराच्या प्रत्येक भागात तसेच हद्दवाढ क्षेत्रातही कोरोना विषाणूने हात-पाय पसरल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. मंगळवारी नवीन भागातील रुग्ण आढळून आल्याने शहराचा निम्मा भाग ‘कंटेनमेन्ट झोन’ मध्ये सामील झाला असून, झोनची संख्या तब्बल ५१ च्या घरात पोहोचली आहे. या परिसरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करून नागरिकांच्या दैनंदिन आरोग्य तपासणीसाठी मनपा प्रशासन सरसावले असतानाच दुसरीकडे कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या भागावरही लक्ष ठेवताना प्रशासनाची चांगलीच दमछाक होत असल्याचे पहावयास मिळत आहे.
महापालिका क्षेत्रात १ ते १९ मे या उण्यापुऱ्या १९ दिवसांच्या कालावधीमध्ये रुग्ण संख्येने २४० चा आकडा ओलांडला असून, आज रोजी ही संख्या २७९ च्या घरात पोहोचली आहे.
इतक्या अल्प कालावधीमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने मनपा प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. आज रोजी शहरातील ५१ भागात कंटेनमेन्ट झोन तयार करण्यात आले आहेत. ही संख्या पाहता शहराचा निम्मा भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित केल्याचे चित्र आहे. ‘कंटेनमेन्ट झोन’ची संख्या वाढल्यास मनपाच्या प्रशासकीय यंत्रणेवर अधिकाधिक ताण येणार आहे.
मंगळवारी जुने शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील सोनटक्के प्लॉट, प्रभाग १८ अंतर्गत येणारा हद्दवाढ क्षेत्रातील अकोली बुद्रुक, प्रभाग १२ मधील पत्रकार कॉलनीनजीकची व्हीएचबी कॉलनी, प्रभाग १५ मधील आदर्श कॉलनी तसेच सावतराम चाळ आदी नवीन परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. या भागाला सील करण्याची कारवाई मनपाच्या स्तरावरून केली जात असून, उद्या बुधवारपासून परिसरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करणे आणि गुरुवारपासून नागरिकांच्या दैनंदिन आरोग्य तपासणीला प्रारंभ केला जाईल.
यासाठी क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या स्तरावर पथकांचे गठण केले जात आहे.


‘हॉटस्पॉट’भागात नियम पायदळी
शहरातील प्रभाग क्रमांक १२ मधील अकोट फाइल, प्रभाग ७ मधील बैदपुरा तसेच जुने शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील खैर मोहम्मद प्लॉट कोरोना विषाणूचे ‘हॉटस्पॉट’ ठरले आहेत. या भागात मनपाच्यावतीने जनजागृती तसेच सूचना करूनही स्थानिक रहिवासी नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. त्यामुळेच प्रशासनाने या भागातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीवर लक्ष केंद्रित केले आहे.


मंगळवारी आणखी पाच नवीन भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. कंटेनमेन्ट झोनचे क्षेत्रफळ कमी केले असले तरीही इतर सर्व प्रक्रिया राबवताना मनपाच्या यंत्रणेवर तान येत आहे.
-संजय कापडनीस, आयुक्त, मनपा.

Web Title: Corona spread; Half city 'containment zone'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.