सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या गावांनी वेशीवरच रोखला कोरोना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:18 AM2021-04-22T04:18:55+5:302021-04-22T04:18:55+5:30
तेल्हारा : तालुक्यात एकूण १०७ गावे असून, ८ गावे ही उजाड आहेत. उर्वरित ९९ गावांपैकी सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या बारूखेडा, ...
तेल्हारा : तालुक्यात एकूण १०७ गावे असून, ८ गावे ही उजाड आहेत. उर्वरित ९९ गावांपैकी सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या बारूखेडा, नागरतास चिपी, भीली, बोरव्हा, तलई या सहा गावांनी कोरोना विषाणूला वेशीवरच रोखले असून, या गावांमध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नसल्याची माहिती आहे.
मागील गेल्या वर्षीपासून कोरोनाने थैमान घातले आहे. प्रत्येक गावात कोरोनाचा संसर्ग पोहोचला आहे. मागील जून २०२० पासून तालुक्यात एकूण १५१३ रुग्ण आढळून आले होते. त्यात ग्रामीणमध्ये ८५१, तर शहरात ६६३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. सद्यस्थितीत १३६ ॲक्टिव्ह रुग्ण असून, ४१ रुग्ण शहरात असून, ९५ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागातील ९३ गावांत कोरोना विषाणुचा संसर्ग पोहोचला. मात्र सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या बारुखेडा, नागरतास चिपी, भीली, बोरव्हा, तलई या सहा गावांतील गावकऱ्यांनी कोरोनाला गावाच्या वेशीवरच रोखले. गावकऱ्यांनी कोरोनाला गावात प्रवेशच करू दिला नाही, हे विशेष. आदिवासी बहुल गावकऱ्यांचा कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे इतर गावाशी व शहराशी संबंध येतो. गावकऱ्यांनी नियमांचे पालन करून गावात कोरोनाला प्रवेश दिला नाही. ही बाब प्रेरणादायी आहे.
या गावांमध्ये अद्याप एकही रुग्ण पॉझिटिव्ह निघाला नाही ही कौतुकास्पद आणि प्रेरणादायी बाब आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या सहा गावांमधील गावकऱ्यांचा एकजुटीचा आणि नियमांचे पालन करण्याचा हा परिणाम आहे.
-डॉ. संतोष येवलीकर,
तहसीलदार, तेल्हारा