अकोला जिल्ह्यातील फटाका बाजाराला बसणार कोरोनाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 11:27 AM2020-11-10T11:27:27+5:302020-11-10T11:29:33+5:30
Fire Cracker News बाजारपेठेला कोरोनाचा फटका बसण्याची शक्यता असल्याने व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
अकोला: गत सहा महिन्यांनंतर पहिल्यांदाच जिल्ह्यातील बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण दिसू लागले आहे. दिवाळीच्या निमित्ताने फटाका बाजारपेठही सजली असून, तब्बल दीड ते दोन कोटी रुपयांच्या फटाक्यांची आयत जिल्ह्यात झाली आहे; परंतु बाजारपेठेला कोरोनाचा फटका बसण्याची शक्यता असल्याने व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दिवाळीचा सण चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्या अनुषंगाने बाजारपेठही सजली आहे. दिवाळीच्या निमित्ताने शहरातील अकोला क्रिकेट क्लब येथे मोठी बाजारपेठ भरत असून, सोमवारपासून व्यावसायिकांनी दुकानेही थाटण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा बाजारपेठेला फटका बसण्याची शक्यता असतानाही व्यावसायिकांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात फटाका बाजारपेठेत गुंतवणूक केली आहे. या वर्षी बाजारपेठेत जवळपास दीड ते दोन कोटी रुपयांचे फटाके आले आहे. बहुतांश फटाके तमिडनाडू राज्यातील शिवकाशी येथून, तर काही प्रमाणात अकोला व खामगाव शहरातून फटाक्यांची मागणी करण्यात आल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली. मोठ्या गुंतवणुकीनंतर आता किती उलाढाल होते, याकडे फटाका व्यावसायिकांचे लक्ष लागून आहे.
गतवर्षी पावसाने फेरले पाणी, यंदा कोरोना
गत वर्षी फटाका बाजारपेठेत चांगली उलाढाल होण्याची आशा व्यावसायिकांमध्ये होती; मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर दमदार पावसाने हजेरी लावल्याने फटाका बाजारपेठ मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली होती. यंदा मात्र कोरोनाचे संकट असल्याने व्यावसायिक हताश झाले आहेत.
कोरोनामुळे यंदा व्यावसायिकांंमध्ये चिंता आहे; मात्र दिवाळी हा सर्वात मोठा सण असल्याने ग्राहक खरेदीला येण्याची आशाही आहे. ग्राहकांसाठी आनंदाची बाब म्हणजे यंदा फटाक्यांच्या किमतीमध्ये वाढ झाली नाही, तर काही फॅन्सी फटाक्यांच्या किमती कमी झाल्या आहेत.
- श्याम महाजन, अध्यक्ष, अकोला किरकोळ फटाका विक्रेता संघ, अकोला