कोरोना : लसीकरणाची यशस्वी सुरुवात; एकालाही नाही ‘रिॲक्शन’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:17 AM2021-01-17T04:17:00+5:302021-01-17T04:17:00+5:30
कोविन ॲपमध्ये तांत्रिक अडचण कोविन ॲपद्वारे लाभार्थींची पडताळणी करून त्यांना लसीकरणानंतर लस दिल्याचा संदेश पाठविण्यात येतो. शनिवारी देशभरात एकाच ...
कोविन ॲपमध्ये तांत्रिक अडचण
कोविन ॲपद्वारे लाभार्थींची पडताळणी करून त्यांना लसीकरणानंतर लस दिल्याचा संदेश पाठविण्यात येतो. शनिवारी देशभरात एकाच वेळी या ॲपचा उपयोग झाल्याने ॲपमध्ये तांत्रिक अडचणी दिसून आल्या. लाभार्थींना उशिरा मेसेज मिळाल्याने काही प्रमाणात गोंधळाची स्थिती होती. शुक्रवारीदेखील अशीच अडचण आल्याने अनेक लाभार्थींना फोन करून लसीकरणाचे निमंत्रण देण्यात आले. या कर्मचाऱ्यांना रात्री उशिरा लसीसंदर्भात मेसेज मिळाले.
असे झाले लसीकरण
‘कोविन ॲप’ मधील नोंदींनुसार नोंदविलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची पडताळणी करण्यात आली.
तत्पूर्वी नोंदणी कक्षात आलेल्या व्यक्तीस टोकन देऊन, नावनोंदणी करण्यात आली.
त्यानंतर ओळखपत्र वा आधार कार्डच्या आधारे नोंदणीची ऑनलाइन पडताळणी करण्यात आली.
पडताळणीनंतर लसीकरण कक्षात लाभार्थींच्या शंकाचे निरसन करण्यात आले.
लसीकरणानंतर लाभार्थीस ३० मिनिटांसाठी वैद्यकीय निरीक्षणात ठेवण्यात आले.
त्यानंतर लाभार्थींना लस घेतल्याचे मेसेज प्राप्त झाले.
पुढील लसीकरण १८ जानेवारीपासून
कोविड लसीकरणाच्या यशस्वी सुरुवातीनंतर उर्वरित लाभार्थींना टप्प्याटप्प्याने लस दिली जाणार आहे. एकूण १५ सत्रात ही लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून, त्याची सुरुवात १८ जानेवारीपासून होणार आहे. ही मोहीम दर आठवड्यात चार दिवस राबविण्यात येणार असून, एकूण ४ हजार ५०० वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.
लसीकरणानंतर ही घ्या काळजी
लस घेणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यींना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर किमान २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जाणार आहे. त्यामुळे लसीकरणानंतरही लाभार्थींनी मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे, तसेच इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवणे या सूत्राचे पालन करणे आवश्यक राहील.