कोरोना संदिग्ध रुग्णाची तपासणी करणारा डॉक्टर, प्रयोगशाळा तंत्रज्ञाला अकोल्याला हलविले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 16:46 IST2020-04-07T16:27:00+5:302020-04-07T16:46:09+5:30
वैद्यकीय तपासणी आणि नमुने तपासणीसाठी अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

कोरोना संदिग्ध रुग्णाची तपासणी करणारा डॉक्टर, प्रयोगशाळा तंत्रज्ञाला अकोल्याला हलविले!
बाळापूर : खामगाव तालुक्यातील चितोडा येथील कोरोनाबाधित रुग्णावर बाळापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार करणाऱ्या डॉक्टर व प्रयोगशाळा तंत्रज्ञाला तालुका प्रशासनाने ५ एप्रिल रोजी रात्रीच पुढील उपचारासाठी अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुढील उपचारासाठी व नुमने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
२९ मार्च रोजी सकाळच्या सुमारास खामगाव तालुक्यातील चितोडा येथे २३ वर्षीय कोरोना संदिग्ध असलेल्या २३ वर्षीय रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर खासगी प्रयोगशाळेत रक्त तपासणी करण्यात आली. संबंधित डॉक्टर व प्रयोगशाळा तंत्रज्ञाने खबरदारी घेत, त्या कोरोनाच्या संदिग्ध रुग्णाची तपासणी केली. या दिवशी रुग्णालयात आलेले सर्व रुग्ण आणि डॉक्टर आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञाच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. संबंधित डॉक्टर आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञामध्ये कोरोनाशी संबंधित लक्षणे दिसून आल्यामुळे दोघांनाही पुढील वैद्यकीय तपासणी आणि नमुने तपासणीसाठी अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले आहे. चितोडा येथील युवक कोरोनाचा संदिग्ध रुग्ण असल्याने, त्याच्यावर उपचार करणाºया संबंधित डॉक्टर व प्रयोगशाळा तंत्रज्ञाची तपासणी करण्याच्या दृष्टिकोनातून नगर परिषदेचे मुख्याधिकारी जी.एस. पवार, तहसीलदार, पुरुषोत्तम भुसारी, ठाणेदार नितीन शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. इशरत खान यांनी तातडीने निर्णय घेत, संबंधित डॉक्टर व प्रयोगशाळा तंत्रज्ञाला अकोल्याला पाठविण्याचे ठरविले. तसेच त्यांच्या दवाखान व प्रयोगशाळा परिसरात नगर परिषद प्रशासनाने तातडीने फवारणी केली. या परिसरात प्रवेश बंदी करण्यात येऊन कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. (शहर प्रतिनिधी)
खासगी डॉक्टर व प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांना रविवारीच अकोल्याला पाठविण्यात आले. त्यांच्याकडे केलेल्या सर्व रुग्णांना होम क्वारंटीन करण्यात आले आहे. दोघांचे वैद्यकीय अहवाल आल्यानंतर काय लक्षणे आहेत, हे समोर येईल.
- डॉ. इशरत खान, वैघकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, बाळापूर