कोरोना आणखी एक बळी; ४९ नवे पॉझिटिव्ह, २९ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 06:34 PM2020-08-08T18:34:48+5:302020-08-08T18:35:09+5:30
८ आॅगस्ट रोजी अकोला शहरातील आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाच्या बळींची संख्या ११५ झाली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजारामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची व नव्याने लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवार, ८ आॅगस्ट रोजी अकोला शहरातील आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाच्या बळींची संख्या ११५ झाली आहे. तर दिवसभरात ४९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या २९७२ वर गेली आहे. दरम्यान, शनिवारी २९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून शनिवारी दिवसभरात आरटीपीसीआर’ चाचणीचे १८४ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ४९ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असून, उर्वरित १३५ अहवाल निगेटिव्ह असल्याचे निदान झाले आहे.
पॉझिटिव्ह असल्याचे निदान झालेल्या रुग्णांमध्ये २१ महिला व २८ पुरुषांचा समावेश आहे. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये रामनगर येथील पाच जणांसह बार्शीटाकळी येथील तीन जण, मुर्तिजापूर येथील तीन जण, प्रसाद कॉलनी येथील तीन जण, दाळंबी येथील तीन जण, केशव नगर येथील दोन जण, केळकर हॉस्पिटल येथील दोन जण, बोरगाव मंजू, रतनलाल प्लॉट, न्यू भिमनगर, चिंतामणी नगर, डाबकी रोड, सिंधी कॅम्प, गोपालखेड, मलकापूर, जीएमसी वसतीगृह, आनंद नगर, सस्ती ता. बाळापूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मुर्तीजापूर येथील सहा जणांसह, दाळंबी येथील तीन जण, लोहारा येथील दोन जण, वाडेगाव येथील दोन जण, पाचमोरी येथील दोन जण, सुधीर कॉलनी व गोपालखेड येथील प्रत्येकी एकाचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
एकाचा खासगी रुग्णालयात मृत्यू
खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा शनिवारी मृत्यू झाला आहे. हा रुग्ण गोरक्षण रोड येथील रहिवासी असून, त्यांना ७ आॅगस्ट रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.
२९ जणांना डिस्चार्ज
शनिवारी दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १०, मुर्तिजापूर उप जिल्हा रुग्णालयातून आठ, आयकॉन हॉस्पिटल येथून तीन, ओझोन हॉस्पिटल येथून एक व हॉटेल रणजित येथून सात जणांना असे एकूण २९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
४८३ जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २९७२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २३७४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ११५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४८३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.