कोरोनाने शिकविले मार्केटिंग; तब्बल आठ टन आंब्यांची थेट ग्राहकाला विक्री!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:13 AM2021-07-19T04:13:45+5:302021-07-19T04:13:45+5:30
अकोला : कोरोनाकाळात शेतमालाला दर न मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठी आर्थिक हानी सहन करावी लागली. मात्र, याच कोरोनाने अनेक शेतकऱ्यांना ...
अकोला : कोरोनाकाळात शेतमालाला दर न मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठी आर्थिक हानी सहन करावी लागली. मात्र, याच कोरोनाने अनेक शेतकऱ्यांना स्वत: मार्केटिंग करणे शिकविले. कापशी तलाव येथील शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील ८ टन आंब्यांची थेट ग्राहकांपर्यंत विक्री केली. लॉकडाऊनच्या काळात त्याने ही किमया साधली आहे.
लॉकडाऊनमुळे बहुतांश शेतकऱ्यांना पडलेल्या दरात व्यापाऱ्यांना माल विकावा लागला. आंबा उत्पादकांवर हीच परिस्थिती आली. मात्र, याच लॉकडाऊनमध्ये थेट ग्राहकांपर्यंत पोहोचून तिप्पट नफा कमाविण्याची किमया कापशी तलाव येथील शेतकरी डॉ. विजय म्हैसने यांनी साधली. डॉ. म्हैसने हे एका महाविद्यायात प्राध्यापक आहेत. त्यांची कापशी तलाव येथे दोन एकर आमराई आहे. या शेतात आंब्याची २४० झाडे आहेत. डॉ. म्हैसने हे दरवर्षी व्यापाऱ्यांना आंबा विकत होते; परंतु यंदा लॉकडाऊन असल्याने व्यापारी कमी दरात आंबा मागत होते. काबाडकष्ट करून पिकविलेला आंबा कमी दरात कसा विकावा, असा प्रश्न त्यांना पडला. यावेळी शेतकरी डॉ. म्हैसने यांनी खचून न जाता हा दर्जेदार आंबा स्वत: थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे ठरविले. त्यांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसादही मिळाला. डॉ. म्हैसने यांनी जवळपास ८ टन आंब्याची विक्री केली.
सोशल मीडिया बनले माध्यम
एका शेतकऱ्याला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचून आंबा विक्री सोपे नसल्याचे डाॅ. म्हैसने यांना माहिती होते. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेतला. एक जाहिरात तयार करून मित्रमंडळी व नातेवाइकांच्या सहकार्याने ही जाहिरात सर्वत्र पाठविली. त्यामुळे त्यांना अपेक्षित प्रतिसादही मिळाला.
कमविला तिप्पट नफा!
शेतकरी डॉ. म्हैसने हे दरवर्षी व्यापाऱ्यांना आंबा विकत असतात. यामाध्यमातून त्यांना दीड लाख रुपये नफा मिळतो. मात्र, यंदा हाच आंबा थेट ग्राहकांना विकल्याने त्यांना ५ लाख ५० हजार रुपयांचा म्हणजेच तिप्पट नफा मिळाला आहे.
मित्राचा ७ टन गावरान आंबाही विकला!
शेतकरी डॉ. म्हैसने यांचे मित्र पातूर येथील शेतकरी रमेश निमकंडे यांचा ७ टन गावरान आंबा होता. शेतकरी निमकंडे यांना व्यापाऱ्यांनी ५०-५५ रुपये प्रतिकिलोने मागितला होता. मात्र, शेतकरी निमकंडे यांचाही आंबा डॉ. म्हैसने यांनी थेट ग्राहकांना विकला. या आंब्याला १५० रुपये प्रतिकिलो दर मिळाला.
चार जिल्ह्यांत पोहोचविला आंबा
शेतकरी म्हैसने यांनी आंबा केवळ अकोल्यातच नव्हे तर वाशिम, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यातही पोहोचविला. खासगी बस, एसटी बस किंवा एखाद्या खासगी वाहनाने त्यांनी बदाम २ टन तर केसर आंबा ६ टन विक्री केला.
याकरिता त्यांना मित्रमंडळींचीही मदत मिळाली.
शेतकऱ्याने मनावर घेऊन परिश्रम घेण्याची तयारी ठेवल्यास स्वत: पिकविलेल्या शेतमालातून तिप्पट नफा कमविता येतो. शेतकऱ्याचा माल व्यापारी प्रक्रिया करून विकतो व नफा कमावितो. हाच नफा शेतकऱ्याला मिळू शकतो.
- डॉ.विजय म्हैसने, शेतकरी, कापशी