अकोला जिल्ह्यातील ११ हजार शिक्षकांच्या काेराेना चाचणी हाेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 11:14 AM2021-01-20T11:14:05+5:302021-01-20T11:14:14+5:30
CoronaVirus Test News ११ हजार ३७८ शिक्षकांच्या काेराेना चाचणी करण्याचे नियाेजन करण्यात येत आहे.
अकोला : यंदा कोरोनामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया प्रभावित झाली आहे. कोरोनामुळे शाळा बंद हाेत्या. अनलाॅक प्रक्रियेत माध्यमिक शाळा सुरू केल्यानंतर आता प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी २७ जानेवारी ही तारीख नियाेजित केली आहे तत्पूर्वी जिल्ह्यातील ११ हजार ३७८ शिक्षकांच्या काेराेना चाचणी करण्याचे नियाेजन करण्यात येत आहे.
कोरोनामुळे कामगार, मजूर हे आपापल्या गावी परतले. यापैकी काहींच्या पाल्यांनी त्यांच्या स्व-जिल्ह्यातच प्रवेश घेतले, तर जिल्ह्यातील काही पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश खासगी शाळेत घेतला; परंतु आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. बाहेरगावी, परप्रांतात गेलेले मजूर रोजगारासाठी जिल्ह्यात परत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये घटलेली विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहे. काेराेनच्या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषद शाळेत पुरेशा प्रमाणात भौतिक सुविधा उपलब्ध करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे, इयत्ता ९ ते १२ वीपर्यंतच्या वर्गांना परवानगी दिल्याने, शैक्षणिक कार्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आत पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याची लगबग सुरू झाली असून शिक्षकांच्या काेराेना चाचणी करण्यात येणार आहेत.
कोरोना संकट कायम असले तरी प्रभाव कमी झाला आहे, तसेच आता जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे प्राथमिक शाळा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली असून, त्यानुसार नियाेजन करण्यात येत आहे शिक्षकांची काेराेना चाचणीबाबत जिल्हा आराेग्य अधिकारी यांच्यासाेबत समन्वय केला जात आहे.
- डॉ. वैशाली ठग, शिक्षणाधिकारी प्राथमिक