अकोला जिल्ह्यातील तीन हजारावर शिक्षकांची कोरोना चाचणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 11:03 AM2020-11-23T11:03:29+5:302020-11-23T11:04:09+5:30
Akola Teachers Covid Test या चाचणीमध्ये रविवारी ३३ शिक्षकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
अकोला: जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये सोमवारपासून सुरू होणार आहेत. त्या पृष्ठभूमिवर आरोग्य विभागामार्फत शिक्षकांची चाचणी करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील तीन हजार ४०२ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये रविवारी ३३ शिक्षकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या शिक्षकांना पुढील उपचारासाठी विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले आहे. शासनाच्या शिक्षण विभागाने २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुभार्भाव कमी झालेला नसताना, शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयाविषयी पालकच नाहीतर शिक्षक सुद्धा आश्चर्य व्यक्त करीत आहेत. कोरोनामुळे शाळांमध्ये सर्वसुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. त्यानुसार शाळांमध्ये सॅनिटायझिंग करण्यात आले आहे. शाळांमध्ये जाणारे शिक्षक निरोगी असावेत. त्यांच्यापासून विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये. या दृष्टीकोनातून शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४२०० पैकी ३ हजार ४०२ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये रविवारी ३३ शिक्षकांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. शिक्षकच कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत असतील तर मुलांना शाळेत कसे पाठवावे. असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.
अकोला २२०(शाळा) १७६६(एकूण शिक्षक) १०६१(चाचणी केलेले शिक्षक)
अकोट ६७ ४८७ ४८७
बाळापूर ५८ ४४८ ४३७
पातूर ५० ५३१ ५२७
बार्शीटाकळी ४५ ३३८ ३३२
तेल्हारा ३८ २७० २६०
मूतिर्जापूर ५८ ३४४ २९८