...तर शनिवारपासून अकोल्यातच होणार ’कोरोना टेस्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 06:29 PM2020-04-10T18:29:15+5:302020-04-10T18:45:33+5:30
चाचणीचा अडथळा पार करण्यात ही लॅब यशस्वी झाली, तर शनिवारपासून अकोल्यातच कोरोना चाचणीला प्रारंभ होणार आहे.
अकोला : कोरोना विषाणूच्या चाचणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयातील ‘व्हीआरडीएल’ला ‘आयसीएमआर’ने मंजुरी दिल्यानंतर शुक्रवारी राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही) पुणे मार्फत या लॅबच्या गुणवत्ता चाचणीला सुरुवात झाली. या चाचणीचा अडथळा पार करण्यात ही लॅब यशस्वी झाली, तर शनिवारपासून अकोल्यातच कोरोना चाचणीला प्रारंभ होणार आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतही शक्य तितक्या लवकर नमुन्यांची तपासणी करण्याच्या दिशेने काही दिवसांपासून प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. जीएमसीच्या परिसरात २०० चौरस मिटर जागेत या प्रयोगशाळेचे बांधकाम असून ‘आयसीएमआर’तर्फे प्रयोगशाळेला ५० लाख रुपये बांधकाम व अन्य स्थापत्य कामांसाठी देण्यात आले होते. प्रयोग शाळा उभारणीचे काम पूर्ण झाले असून, आवश्यक वैद्यकीय उपकरणांचेही इन्स्टॉलेशन झाले आहेत. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी ‘आयसीएमआर’ने मंजुरी दिली होती. राष्ट्रीय विषाणू संस्था, पुणे मार्फत शुक्रवारी गुणवत्ता चाचणी घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या चाचणीचा निकाल शनिवारी येणार आहे. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पास झाल्यास शनिवारपासूनच अकोल्यात कोरोना रुग्णांची वैद्यकीय चाचणी घेण्यास सुरुवात केली जाणार आहे.
अकोल्यासह वाशिम, बुलडाण्यासाठी सोईचे
अकोल्यातील प्रयोग शाळेत अकोल्यासह वाशिम आणि बुलडाणा जिल्'ातील रुग्णांची वैद्यकीय चाचणी घेतली जाणार आहे. ही लॅब एकाच दिवसात जवळपास ९० रुग्णांची वैद्यकीय चाचणी घेण्यास सक्षम असून, कोरोनाचे कमी वेळात निदान होण्यास मदत मिळणार आहे.
एनआयव्ही मार्फत अंतिम गुणवत्ता चाचणी घेण्यास सुरुवात झाली असून, शनिवारपर्यंत त्याचे निकाल येणार आहेत. यामध्ये पास झाल्यास उद्यापासूनच चाचणीला सुरुवात करणे शक्य होणार आहे.
- डॉ. नितीन अंभोरे, विभाग प्रमुख, शुक्ष्मजीवशास्त्र विभाग, जीएमसी, अकोला