कोरोनाने घेतला आणखी दोघांचा बळी; १९ नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 11:55 AM2020-08-03T11:55:46+5:302020-08-03T11:56:06+5:30
सोमवार, ३ आॅगस्ट रोजी कोरोनामुळे जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू झाला.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, अत्यंत संसर्गजन्य असलेल्या या आजाराला बळी पडणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. सोमवार, ३ आॅगस्ट रोजी कोरोनामुळे जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू झाला. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ११२ झाला आहे. आणखी १९ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या २६९८ वर पोहचली आहे.
विदर्भात नागपूरनंतर सर्वाधिक कोरोनाग्रस्तांचा जिल्हा म्हणून ओळख निर्माण झालेल्या अकोल्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून सोमवारी सकाळी आरटीपीसीआर’ चाचणीचे ५० अहवाल प्राप्त झाले. यापैकी १९ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३१ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये सात महिला व १२ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये बाभूळगाव येथील तीन, रेणुका नगर व बाळापूर येथील प्रत्येकी दोन, तर कापशी, उमरी, सिव्हिल लाईन, घोडेगाव ता. तेल्हारा, सहकार नगर, सुवर्णा नगर, पी एस मुख्यालय, मूर्तिजापूर, लोहारा ता. बाळापूर, डाबकी रोड, खदान व जवाहर नगर येथील एकाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
दाळंबी, लोहारा येथील दोघांचा मृत्यू
सोमवारी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यापैकी एक रुग्ण हा दाळंबी येथील ७१ वर्षीय पुरुष असून, त्यांना २ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते. दुसरा रुग्ण बाळापूर तालुक्यातील लोहारा येथील ५१ वर्षीय पुरुष असून, त्यांना १ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते.
४४० जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २६९८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २१४६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ११२ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४४० अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्राप्त अहवाल- ५०
पॉझिटीव्ह- १९
निगेटीव्ह- ३१
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २३३२+३६६=२६९८
मयत-११२
डिस्चार्ज- २१४६
दाखल रुग्ण (अॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)-४४०