Corona Vaccination in Akola : दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरू नका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 11:08 AM2021-05-05T11:08:22+5:302021-05-05T11:08:28+5:30
Corona Vaccination in Akola: केंद्र शासनाकडून लसीचा मोठा साठा बुधवारी सायंकाळपर्यंत मिळणार असल्याची माहिती आहे.
अकोला : १ एप्रिलपासून राज्य शासनामार्फत १८ ते ४५ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली होती, तर १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांनाच लसीकरणाचा निर्णय झाला. आधीच लसचा तुटवडा असतानाच, युवकांच्या लसीकरणाने त्यात भर पडली आहे. त्यामुळे दुसऱ्या डाेसची तारीख जवळ आलेल्या लाभार्थ्यांना डाेस घेण्यास उशीर हाेणार का, अशी भीती निर्माण झाली हाेती. मात्र, आता लसीची प्रतीक्षा संपली असून, गुरुवारपासून लसीकरणाला सुुरुवात होणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडून लसीचा मोठा साठा बुधवारी सायंकाळपर्यंत मिळणार असल्याची माहिती आहे.
गत काही दिवसांपासून लसीचा साठा उपलब्ध नसल्याने ४५ वर्षांवरील अनेकांना लस मिळणे कठीण झाले होते. लसीअभावी अनेकांना दुसरा डोसही मिळत नव्हता. त्यामुळे अनेकांना लस न घेताच, केंद्रावरून परतावे लागायचे. मात्र, ४५ वयोगटांवरील लाभार्थ्यांची लसीची प्रतीक्षा संपली असून, गुरुवारपासून लसीकरणाला सुुरुवात होणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडून लसीचा मोठा साठा बुधवारी सायंकाळपर्यंत मिळणार असल्याची माहिती आहे. केंद्र शासनामार्फत ४५ वर्षांवरील सर्वांनाच मोफत कोविड लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. मध्यंतरी केंद्र शासनामार्फत कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा खंडित झाला होता. तसेच ४५ वर्षावरील लाभार्थींसाठी मर्यादित डोस शिल्लक असल्याने मोजक्याच केंद्रावर लसीकरण राबविण्यात आले होते. त्यामुळे इतर केंद्रांवर ४५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटांतील लाभार्थींना लसीपासून वंचित राहावे लागले. कोणाला पहिला, तर कोणारा दुसरा डोस मिळणे कठीण झाले होते, मात्र, लसीची ही प्रतीक्षा आता संपली असून, गुरुवारपासून जिल्ह्यातील बहुतांश केंद्रावर लसीकरण होणार आहे.
चिंता नकाे कोव्हॅक्सिनही मिळणार
बुधवारी केंद्र शासनामार्फत लस मिळणार आहे. यामध्ये कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन दोन्ही लसींचा समावेश असण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुरुवारपासून ४५ वर्षांवरील लाभार्थींच्या लसीकरणास सुरुवात होईल.
दुसरा डाेस उशिरा घेतला, तरी हरकत नाही
लसीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे काही ठिकाणी दुसरा डाेज मिळण्यास उशीर हाेत आहे. यामुळे घाबरून जाऊ नका, काही प्रमाणात उशीर झाल्यास राेग प्रतिकार शक्ती निर्माण हाेण्यास काही उशीर हाेऊ शकताे. मात्र, त्यामुळे कुठलाही दुष्परिणाम हाेत नाही. मुदतीत हे डाेस घ्यावे, असे मत जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.राजकुमार चव्हाण यांनी व्यक्त केले. आपल्या जिल्ह्यात दुसऱ्या डाेससाठी प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थांनाही लस मिळण्यास फारसा विलंब झालेला नाही. त्यामुळे काेणीही घाबरू नये, असे आवाहन ही त्यांनी केले.